Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण औरंगाबाद खंडपठाकडून पोलीस महासंचालक, जळगाव पोलीस अधिक्षक यांना नोटीस

 पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण

औरंगाबाद खंडपठाकडून पोलीस महासंचालक, 

जळगाव पोलीस अधिक्षक यांना नोटीस


जळगाव  (कटूसत्य वृत्त):- पाचोरामधील ज्येष्ठ पत्रकार संदिप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावली आहे. संदीप महाजन मारहाण प्रकरणी खंडपीठाने पोलिसांना 25 ऑक्टोबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरील बातमी वरून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात पत्रकार संदिप महाजन यांना अर्वाच्च शिवीगाळ केली होती. तसेच महाजन यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी विविध वृत्त वाहिन्यांवर त्यांनी केलेल्या शिवीगाळचे समर्थन देखील केले होते. त्यानंतर किशोर पाटील यांच्या समर्थकांनी 9 ऑगस्ट रोजी पत्रकार संदीप महाजन यांना रस्त्यावर जबर मारहाण केली. परंतु या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील सर्व पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला. विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत 17 ऑगस्टला राज्यभर निदर्शने केली. सरकारला निवेदने देण्यात आली. तरीही सरकार कडून या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही.

या सर्व प्रकारांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब तसेच अखिल भारतीय पत्रकार परिषद आदी विविध संघटनांनी गंभीर दखल घेतली. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तज्ज्ञ पत्रकारांची एक समिती गठीत केली.

पत्रकार संरक्षण कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अखेर या प्रकरणी पत्रकार संदिप महाजन यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि ॲड. मंगला वाघे यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक,  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगांवचे पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवून 25 ऑक्टबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. संदीप महाजन यांच्या वतीने मुंबईच्या ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मंगला वाघे आणि संभाजीनगर मधील ज्येष्ठ वकील ॲड. हर्षल रणधीर हे उच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments