सोलापूर जिल्ह्यात गुटखाबंदी कागदावर..!
अन्न व औषधी विभाग टेबलावर...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये गुटखाबंदी फक्त कागदावरच दिसत असल्यामुळे गावागावात आणि शहरातील सर्व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री आणि मावा विक्री राजरोषपणे सुरू असल्याचं दिसत आहे. अन्न व औषधी विभागाला टेबलाखालून मलिदा मिळत असल्यामुळे आणि पोलिसांना चिरीमिरी मिळत असल्यामुळेच गुटखा बंदी होत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक होत असून कर्नाटक मार्गे हा गुटखा येत असल्याचे खबरे सांगतात. तरीही पोलीस या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई न करता त्यांचा सत्कार करतात हीच मुळात खेदजनक बाब आहे. या गुटखा विक्रीचा तरुणांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्यामुळे कर्करोगासारखा रोग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मावा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यामुळे आणि हे खाण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी रांगा लावून तरुण वर्ग करत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक तरुणांना गुटका आणि माव्याची फार मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्यामुळे अनेकांना जेवण सुद्धा व्यवस्थित करता येत नसून तोंड सुद्धा उघडता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारने आरोग्य हीच संपत्ती हा विचार घेऊन गुटखाबंदी ची कडकपणे अंमलबजावणी केली तरच या राज्यातला तरुण सुदृढ आणि आरोग्य संपन्न राहील अन्यथा तो व्यसनाधीन होऊन लवकरच संपेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रासायनिक पदार्थांचा वापर करून गुटखा आणि मावा बनवला जातो त्यामुळे खाणाऱ्या तरुणांच्या शरीरासाठी हे फारच हानिकारक असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. गुटखा खाणे शरीरासाठी अतिशय हानिकारक असल्याचे शासन एकीकडे जाहिरात करून सांगते आणि दुसरीकडे गुटखा विक्रीला आशीर्वाद देत असेल तर कधी होणार गुटखाबंदी.. ? नुसती कागदावर गुटखाबंदी करून काहीच फायदा होणार नाही त्यासाठी सरकारने या गुटखाबंदीच्या मुळावर घाव घातला पाहिजे आणि गुटखाबंदीच्या कंपन्या प्रथम सील केल्या पाहिजे तरच या देशातील तरुणांचे आयुष्य वाचेल.तरुण सध्या गुटख्याबरोबरच मटका आणि फुटकळ दारूच्या आहारी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे सुद्धा वळू लागल्याचं दिसत आहे पोलिसांनी धंदे करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच वेसन घातली पाहिजे आणि चिरीमिरी न घेता देशातील तरुणाई वाचवली पाहिजे. अशा प्रतिक्रिया सध्या नागरिकांमधून उमटू लागले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना गुटखाबंदी मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवली होती परंतु नंतरच्या काळात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र गुटखाबंदी नुसती कागदावरच ठेवल्यामुळे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि त्यामध्ये दहा-बारा वर्षाचे तरुण व्यसनाधीन होऊ लागल्यामुळे तरुणांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून गुटखाबंदी कायदा कडक करण्याची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
0 Comments