Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल यंत्रणेची भूमिका महत्वाची - राज्य सहकार निवडणूक आयुक्त जगदीश पाटील

 शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल यंत्रणेची भूमिका महत्वाची - राज्य सहकार निवडणूक आयुक्त जगदीश पाटील       

 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासकीय यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांमुळेच सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो. सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी महसूल प्रशासनाची  भूमिका महत्वाची असून, शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत  पोहचविण्यासाठी सर्वांनी तत्परतेने काम करणे गरजेचे असल्याचे  राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी सांगितले.

          छत्रपती रंगभवन सभागृहात आयोजीत महसूल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, वर्षा लांडगे, तहसिलदार बाळासाहेब शिरसट, अमोल कुंभार तसेच तलाठी,महसूल संघटना, पोलीस पाटील संघटना तसेच जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

           यावेळी  राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त पाटील म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. महसूल प्रशासनाकडे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक  कामे घेऊन येतात . इथे येणारा प्रत्येक नागरिकाचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे महसूल विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू म्हणून काम करावे. प्रशासन व नागरिक यामध्ये दरी असता कामा नये. नागरिकांची विविध कामे, त्यांच्या समस्या, शासनाच्या विविध योजनांचा त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे यासाठी माहिती व तंत्रज्ञान याचा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हवा. महसूल विभागातील सर्व घटकांनी आपली विविध कामे व जबाबदाऱ्या पार पाडताना आपला परिवार व आरोग्य याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात दिनांक १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. त्यामाध्यमातून गावोगावी जनतेपर्यंत पोहचून शासनाच्या योजना पोहचविण्याचा प्रयत्न झाला. यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासनातील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. जिल्ह्यात शासन व प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच शासनाने व प्रशासनाचे ध्येय आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे महसूल सप्ताह यशस्वीपणे राबवण्यात मोलाचे सहकार्य झाले यापुढे वर्षभर नागरिकांना प्रशासनाच्या विविध सेवा तत्परतेने देण्यासाठी कोतवाल, पोलीस पाटील,तलाठी ते जिल्हाधिकारी हे सर्व घटक तत्परतेने कार्यरत राहतील. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द होऊन जिल्हा विकासाच्या उंचीवर पोहचवू या असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले.

           महसूल विभागातील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांचे मेहनतीचे कौतुक करण्याचा महसूल दिवस हा एक कार्यक्रम आहे. यावर्षी महसूल दिन हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्य शासनाचे ध्येयधोरण आणि निर्णयांची अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे. महसूल विभागाच्या योजना, उपक्रम आणि डिजिटल सोयीसुविधांच्या माध्यमातून लोकांपर्यंत लाभ पोहोचविण्याचा पुढाकार प्रशासनाने घेतला आहे, लोकांचे काम वेळेत होण्यासाठी काळानुसार होणारे बदल आपण स्विकारणे आवश्यक असल्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी सांगितले.

            महसूल खात्यातील परंपरा आणि प्रवास खूपच अनुभवी असतो. महसूलमध्ये कामांची खूपच वैविध्यता आहे. या खात्यात काम करणे खरोखरच भाग्याचे आहे. प्रशासनात आता तंत्रज्ञानाचा कारभार वाढत आहे. त्यामुळे कारभारातील सुसूत्रता वाढत आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी काम करत असताना सर्व प्रकारचे बदल स्विकारले पाहिजेत व लोकांमध्ये कामातून अधिक चांगल्या प्रकारचा विश्वास निर्माण केला पाहिजे असे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले. तसेच प्रांताधिकारी गजनान गुरव यांनी फेरफार व सातबारा विषयक माहिती यावेळी दिली.

             महसूल सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने महसूल विभागातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव तसेच दहावी व बारावी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा मान्यवरांच्याा हस्ते गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांचा सत्कार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख  यांनी तर आभार प्रदर्शन निवासी  उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments