कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'संघर्षाची मशाल हाती' या पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'संघर्षाची मशाल हाती' या पुस्तकाचे प्रकाशन 'माकपा'चे महासचिव तथा माजी खासदार सीताराम येचुरी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सीताराम येचुरी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कर्नाटक की तो ये अंगाई है आगे बहुत बडी लढाई है. समुद्रमंथनांमधून अमृत आणि विष हे दोन्ही बाहेर पडते. पण अमृताचा कलश हा चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. त्यामुळे आज देशाची दुरावस्था झाली आहे. त्यांच्या हातातून हा अमृतकर काढून घेण्यासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही.
कम्युनिस्ट व्यक्तींवर नास्तिकतेचा शिक्का मारला जातो. पण कम्युनिस्ट हा माणुसकी जपतो. त्यामुळे आमच्यावर कितीही टीका झाली तर आम्ही आमची माणुसकी जपत राहू, संविधान टिकवत राहू आणि संविधानाच्या अधीन राहूनच देशांमध्ये सत्ता बदल घडवून आणू, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, आडम मास्तर हे लहानपणापासून गरिबीमध्ये वाढलेले नेते आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसाची, कामगारांची परिस्थिती जवळून पाहिलेली आहे. कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ते कामगारांचे नेतृत्व करत आहेत.
डॉ. उदय नारकर म्हणाले की, जीवन चरित्रावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये कधीही झाले नाही, असा विक्रम मास्तर यांनी करून दाखवला आहे. असे विक्रम आडम मास्तर हे नेहमीच करत असतात म्हणून त्यांना आम्ही विक्रम वीर म्हणून संबोधतो.
माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी असंघटित कामगारांसाठी काम करत आहे. मला राहायला घर नव्हते. त्यामुळे दहा वर्षाचा आयुष्य मी मारुती मंदिरात झोपून काढलं होतं. आजमितीस ४१ हजार ६०० लोकांना हक्काचं घर मिळवून देताना जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. यावेळी अॅड. एम.एच. शेख, कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, सुहास कुलकर्णी, युसुफ मेजर, सनी शेट्टी, अॅड. अनिल वासम यांच्यासह 'माकपा'चे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments