उद्योग क्षेत्रात गरुड झेप घेणारे डॉ. कौशिक तात्या गायकवाड शिक्षण क्षेत्रात देणार योगदान
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहर आणि तालुक्यामध्ये उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे डॉ. कौशिक संदीपान गायकवाड शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा दर्जेदार अशा प्रकारचे योगदान देऊन उल्लेखनीय कार्य करतील असं प्रतिपादन संस्थेचे संचालक त्रिंबक आबा चव्हाण यांनी केले.
ते मोहोळ तालुक्यातील नामवंत सद्गुरु समर्थ भवानी महाराज संस्थेच्या संचालक पदी डॉ. कौशिक तात्या गायकवाड यांची निवड झाल्याने आयोजित सत्कारा प्रसंगी बोलत होते.
गेल्या 40 ते 45 वर्षांपूर्वी मोहोळच्या नागनाथ नगरीमध्ये 'डीएमके' अर्थातच 'दादा मामा काका' या त्रिमूर्ती ने सद्गुरु समर्थ भवानी महाराज संस्थेचे बीज रोवलं. त्याचे आज विशाल वटवृक्ष झाले असून या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे. मोहोळ तालुक्यात राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला आणि इतर शाखा यांचा मोठा विस्तार होत आहे. त्याचं कारण म्हणजे शिक्षण क्षेत्रात योगदान देणारी माणसं...!
याप्रसंगी प्राचार्य सुधीर गायकवाड म्हणाले की, मोहोळ शहर आणि तालुक्यामध्ये उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे डॉ. कौशिक संदीपान गायकवाड यांच्यावर सद्गुरु समर्थ भवानी महाराज संस्थेच्या संचालक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या संधीचं सोनं करण्याची ताकद कौशिक तात्या या नावात असल्यानेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा तात्या योग्य असे मार्गदर्शन करुन 'दादा मामा काका' यांची जागा भरून काढतील अशी खात्री आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. कौशिक तात्या गायकवाड म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं उच्च शिक्षण घेऊन लाल दिव्याच्या गाडीत दिसली पाहिजेत. त्यासाठी दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे.
मोहोळ तालुका हा एक आयडॉल बनला पाहिजे त्यासाठी या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये बदल घडविणे हेच खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थेचे कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य आपण करण्याचे प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी बोलताना डॉक्टर कौशिक तात्या गायकवाड यांनी सांगितलं.
या सत्कार प्रसंगी युवा उद्योजक वैभव ( बापू) गुंड, संस्थेच्या संचालिका रंभा देवी गुंड, प्राचार्य सुधीर गायकवाड, संतोष गायकवाड आदीसह मान्यवर उपस्थित होते.
0 Comments