हनगल्ल गुरू कुमार शिवयोगीजी यांच्या जीवनावरील चित्रपट समाजाला मार्गदर्शक - काशी जगदगुरू
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- वीरशैव समाजाची परंपरा पुढे नेणारे समाजात समता निर्माण करणारे हनगल्ल गुरू कुमार शिवयोगीजी यांच्या जीवनावरील चित्रपटातून समाजाचा उध्दार तर होणारच आहे त्याचबरोबर समाजाला मार्गदर्शकही राहणार आहे असे प्रतिपादन काशी जगदगुरू श्री मल्लिकार्जुन महाराज यांनी केले. हनगल गुरूकुमार शिवयोगी महाराज यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा परिसरात असलेल्या समाधान आश्रमातून काढण्यात येणाऱ्या रथयात्रेचा शुभारंभ काशी जगदगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते यावेळी नागणसूर मठाचे अभिनव महास्वामी, अक्कलकोट मठाचे बसवलिंग महास्वामी, दहिटणेचे मुरगेंद्र स्वामी, मादनहिप्परगाचे शांतवीर शिवाचार्य, हत्तीकणबसचे प्रभुशांत महास्वामी ओंकार आश्रमाच्या सुशांताबाई महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात संघठीत नसलेल्या समाजाला एकत्र करून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.अंध अपंग व्यक्तींना संगीत शिक्षण, स्त्रियांना शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण करून अखिल भारतीय वीरशैव महासभेची स्थापना तसेच शिवयोग मंदिराची स्थापना,ताड पत्रावरच शिवशरणांच्या वचनांचा संग्रह, गोशाळा,विभुती,इष्टलिंग तयार करणे, शेतकऱ्यांना आधुनिक शेती बदलाची माहिती, आयुर्वेद चिकित्सालय याचबरोबर चित्रपट गृह निर्मिती अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून लोकाभिमुख व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले हनगल्ल श्री गुरू कुमार शिवयोगीजी यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण झालेला आहे. तो चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून मार्गदर्शन घेतले पाहिजे असेही काशी जगदगुरू यांनी सांगितले.
प्रारंभी सिध्देश्वर किणगी यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर सर्व महास्वामी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील समाधान आश्रमातून निघणारी ही रथयात्रा अक्कलकोट मार्गे गदग येथे पोहोचणार आहे त्याच प्रकारे एकूण 6 ठिकाणाहून निघणाऱ्या रथयात्रेचा दि. 20 डिसेंबर 2022 ते दि. 1 जानेवारी 2023 या दरम्यान 7 हजार किलोमिटरचा प्रवास राहणार आहे. या सर्व 6 रथांचा समारोप गदग येथे होणार आहे त्यातून 360 सभा होणार आहेत या संपूर्ण रथयात्रेतून 1 कोटी लोकांचा सहभाग राहणार आहे. यावेळी डॉ. शरणबसप्पा दामा, प्रकाश खोबरे, महेश पाटील, संगनबसप्पा स्वामी, सोमशेखर चेल्लूर, मल्लू बिराजदार, सिध्देश्वर किणगी आदींसह मोठ्यासंख्येने भक्त उपस्थित होते.
0 Comments