दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मंद्रूप ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही वेळा झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. यंदा मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत मंद्रूप मधील स्थानिक कोरे गटाने भाजप पुरस्कृत सरपंच पदाच्या उमेदवाराला चारी मुंड्या चित करत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. मंद्रूप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का लागला आहे.
मंद्रूप ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातील महिला हे सरपंच पदासाठी आरक्षण होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरे गटाकडून त्यांच्या घरातीलच अनिता तुकाराम कोरे, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत प्रभावती सिद्राम हेळकर, काँग्रेस-प्रहार पुरस्कृत शितल राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी टेळेसह 5 महिला उमेदवार रिंगणात होत्या.
या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी ताकद लावली होती ते मंद्रूपमध्ये घरोघरी फिरल्याचे दिसून आले तर स्थानिक कोरे गटाचे नेते स्वर्गीय गोपाळकाका कोरे यांच्या निधनाची सहानुभूतीवर होती. काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला प्रहार संघटनेची साथ मिळाली होती. त्याचबरोबर मंद्रूप एमआयडीसीचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. मंद्रूप एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्याचा फटकाही भाजपला बसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीच्या अनिता कोरे यांना सहानुभूतीसह गावात पूर्वीपासून कोरे गटाचे असल्याने मोठे मताधिक्य मिळाले आणि त्या 930 मतांनी विजयी झाल्या. सरपंच पदासाठी मिळालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनिता तुकाराम कोरे (3747)
शीतल मोहन राठोड (2817)
प्रभावती सिद्राम हेळकर (2179)
निकाल जाहीर होताच नार्थकोट प्रशालेच्या बाहेर कोरे समर्थक युवकांनी एकच जल्लोष केला.
प्रतीक कोरे यांनी ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्तीची होती त्यात जनतेने धनशक्तीला मोठी चपराक लगावली आहे. हा विजय म्हणजे मंद्रूपच्या सर्वसामान्य नागरिकांचा विजय असून कोरे परिवार विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे.
0 Comments