खा.पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील स्पर्धेत महिला गटात उस्मानाबाद, पुरुष गटात पुणे विजेते
खो खो दिन : राज्य निमंत्रित पुरुष व महिला खो खो स्पर्धा, गणपुले व मोरे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- खो खो दिनानिमित्त मोहोळ येथे झालेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत पुरुष गटात नवमहाराष्ट्र संघ पुणे तर महिला गटात विरुद्ध छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संघाने विजेतेपद पटकाविले. आदित्य गणपुले व संपदा मोरे हे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचे मानकरी ठरले.
खो खोचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस खोखो दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त या स्पर्धेचे आयोजन आमदार यशवंत माने यांनी महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यू स्पोर्ट्स अकॅडमी संचलित न्यू सोलापूर खो खो क्लबच्या सहकार्याने केले होते.
मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादने ठाणेच्या रा.फ. नाईक संघास ११-८ असे ३ गुणांनी हरविले. मध्यंतरापर्यंत ठाणेच्या शीतल भोर (२.००, १.१०मि. व २ गुण), व गीतांजली नरसाळे (२.१०, १.३०मि.) यांनी शानदार खेळ करीत उस्मानाबादला बरोबरीत रोखले होते. नंतर मात्र, उस्मानाबादच्या संपदा मोरे (२.२०, २.३०मि. व ४ गुण) व अश्विनी शिंदे (३.००, ३.४०मि.) यांनी बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. अश्विनी, पूजा फरगडे व संपदा हे अनुक्रमे संरक्षक, आक्रमक व अष्टपैलू पुरस्काराचे मानकरी ठरले. तृतीय व चतुर्थ स्थान अनुक्रमे राजमाता जिजाऊ संघ पुणे व संस्कृती संघ नाशिक यांनी मिळविले.
पुरुष गटात पुणेच्या नवमहाराष्ट्र संघाने शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगरवर १४-१३ असा पराभव केला. पुण्याने मध्यंतरासच ९-६ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. ती आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. आदित्य गणपुले (२.००, १.००मि. व ३ गुण) व प्रतिक वाईरकर (२.००, १.००मि. व २ गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबई उपनगरच्या अनिकेत पोटे (२.१०, १.२० मि. व ३ गुण) व ऋषिकेश मुर्चावडे (२.००मि. व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. प्रतिक, ऋषिकेश व आदित्य हे अनुक्रमे संरक्षक, आक्रमक व अष्टपैलू पुरस्काराचे मानकरी ठरले. तृतीय व चतुर्थ स्थान अनुक्रमे विहंग क्रीडा मंडळ ठाणे व रणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड सांगली यांनी मिळविले.
पारितोषिके आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय संघास अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपयाचे रोख पारितोषिक व करंडक देण्यात आले.
श्वेता हल्ले यांनी सूत्रसंचालन केले. अधिसभा सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी स्पर्धा सचिव संतोष कदम, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ व्यवहारे, प्रिया पवार, सुरेश भोसले, गुलाम मुजावर, गोकुळ कांबळे, युसुफ शेख, प्रथमेश हिरापुरे, आनंद जगताप, रवी मैनावाले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments