महिला गटात उस्मानाबाद-ठाणे, पुरुष गटात पुणे- मुंबई उपनगर अंतिम लढत
खो खो दिन : राज्य निमंत्रित पुरुष व महिला खो खो स्पर्धा
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- येथे सुरू असलेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत पुरुष गटात नवमहाराष्ट्र संघ पुणे विरुद्ध शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगर तर महिला गटात रा.फ. नाईक खो-खो संघ ठाणे विरुद्ध छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद असे अंतिम सामने होतील.
खो खोचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस खोखो दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त या स्पर्धेचे आयोजन आमदार यशवंत माने यांनी महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यू स्पोर्ट्स अकॅडमी संचलित न्यू सोलापूर खो खो क्लबच्या सहकार्याने केले आहे.
मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटातील उपांत्य सामन्यात उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने नाशिकच्या संस्कृती क्लबवर ६-५ असा ६.१० मिनिटे राखून दणदणीत विजय मिळविला. प्रणाली काळे (२.१०,२.४०मि.) , संपदा मोरे (२.१०,१.२०मि. व ३ गुण ) व अश्विनी शिंदे (३.५०,५.००मि.) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. नाशिकच्या मनीषा पडेल (१.१०,२.१०मि. व १ गुण ) हिची एकाकी लढत अपुरी पडली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात ठाणेच्या रा.फ. नाईक खो-खो संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघास १९-१२असे ७ गुणांनी पराभूत केले. त्यांच्या शीतल भोर (२.२०,२.००मि. व ३ गुण ) व पूजा फरगडे (१.३०,१.३०मि. व ४ गुण ) यांनी लढत दिली.
पुरुष गटातील उपांत्य सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने विहंग क्रीडा मंडळ ठाणे संघास ११-१० असे २.४० मि. राखून नमविले. मध्यंतरासच त्यांनी ७-५ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या सुयश गरगटे आक्रमणात ४ गडी बाद करीत २ मिनिटे संरक्षण केले. ऋषभ वाघ (२.२०, २.५० मि.)व प्रतिक वाईकर (२.२०,२.००मि.) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. ठाण्याच्या आकाश तोगरे (१.४०,१.५०मि. व ५ गडी )व लक्ष्मण गवस (२.१०, १.५०मि.व ३ गडी) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात राणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड (सांगली) संघावर १३-१२ अशी १ गुण व ३० सेकंद राखून अशी मात करताना शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगरची चांगलीच दमछाक झाली. मध्यंतराची ७-६ ही एका गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. ऋषिकेश मुरचावडे(२.१०,१.३०मि. व २ गडी), निहार दुबळे (२.३०,१.३०मि. व २ गडी) व नितेश रुके (१.३०, १.२० मि. व २ गडी) यांची अष्टपैलू खेळी संघास विजय मिळवून दिली. कुपवाडकडून सागर गायकवाड (२.३०,१.४०मि.) व मल्लिकार्जुन हसुर (१.२०, २.०० मि. व २ गडी) यांची भक्कम खेळी संघास पराभवपासून वाचवू शकली नाही.
0 Comments