आपल्यावरील जबाबदारी ताकदीने पार पाडून महिला अधिकाऱ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे: तेली-उगले
सोलापूर विद्यापीठात महिला नेतृत्व विकास प्रशिक्षणास प्रारंभ
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिला निर्णय घेण्याचे आणि अधिकार राबवण्याचे स्वातंत्र्य मिळते, तिला आपण सशक्त स्त्री म्हणू शकतो. स्त्री-पुरुष कोणताही भेदभाव न करता व महिलांनी तसा कोणताही न्यूनगंड न बाळगता सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात आपल्यावर आलेली प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पार पाडून आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वुमेन सेल आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे (एमएसएफडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिलांच्या नेतृत्व विकासा'वर आयोजित पाच दिवसीय विशेष कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तेली-उगले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, एमएसएफडीएचे समन्वयक मिखिलेश भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वुमन सेलच्या सचिवा डॉ. अंजना लावंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
आयुक्त तेली-उगले म्हणाल्या की, आज महिला पुरुषांपेक्षा अधिक काम करतात. कष्ट करण्याची क्षमता महिलांमध्ये अधिक असते. तशी मानसिकता देखील महिलांची असते. सामाजिक व प्रशासकीय जीवनात देखील महिला शिक्षक, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कोणतेही काम करताना न डगमगता त्याला सामोरे जावे. सहकाऱ्यांना सोबत घेऊन जबाबदारी वाटून तसेच सपोर्ट सिस्टीम निर्माण करून प्रत्येक गोष्ट मोठ्या हिमतीने महिला अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी महिला नेतृत्व क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबीची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यामध्ये सहभागी महिला शिक्षक व अधिकाऱ्यांनी केवळ आपला प्रशासकीय फायदा न बघता आपले ज्ञान कसे वृद्धिंगत करता येते आणि आपण कसे सशक्त बनू शकतो, यासाठी लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. त्याचबरोबर या प्रशिक्षणात चांगले प्रशिक्षक असून त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनात शिकण्यासाठी व आपला विकास करण्यासाठी तसेच नेतृत्व घडवण्यासाठी फायदा करून घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाविषयी देखील आपण जागरूक राहावे, यासाठी देखील प्रशिक्षणात मार्गदर्शन होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उद्घाटन सत्रानंतर आज कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या अभ्यासाविषयी दृष्टिकोन या विषयावर मुंबईच्या डॉ. शिल्पा चरणकर यांनी सहभागीता पद्धतीने प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेमध्ये राज्यभरातील महिला शिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेच्या सहसमन्विका प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार डॉ. ज्योती ठेंगे-माशाळे यांनी मानले.
0 Comments