महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्वीकारला पदभार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आयएएस शितल तेली-उगले यांनी आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. सोलापूर महानगरपालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त आहेत. आजवर त्यांनी पुणे, नागपूर, रायगड येथे विविध पदांवर सेवा बजाविली आहे.
आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आयुक्त शितल तेली-उगले यांचे महानगरपालिकेत आगमन झाले. औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शितल तेली-उगले या मुळच्या अहमदनगर जिल्ह्याच्या आहेत. शिक्षण पुण्यात सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये झाले. त्यांचे पती डॉ. बसवराज तेली हे आयपीएस अधिकारी असून सध्या सांगली येथे पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत.
2007 साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून शितल तेली-उगले यांना आयआरएस म्हणजेच भारतीय महसूल सेवेत संधी मिळाली. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी सुरु असतानाच पुन्हा केलेल्या प्रयत्नामध्ये त्यांना 2009 मध्ये आयएएस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेत यश मिळाले. देशात त्यांचा 37 रँक आला. त्या महाराष्ट्रात टॉपर होत्या.
प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर परिविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथे सेवा बजाविली. त्यानंतर त्यांची पोस्टींग सहायक जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर येथे झाली. जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेत अतिरीक्त आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक पदावर त्या कार्यरत असताना आता त्यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्या सोलापूर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत.
0 Comments