'ते' पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री म्हणून
.png)
मुंबई (कटूसत्य वृत्त):- भाजपचे नेते आणि महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन तासांपूर्वी याच राजभवनात जेव्हा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि आपण मंत्रिमंडळात नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासांत दिल्ली हायकमांडच्या आदेशानंतर त्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचे निर्देश दिले आणि त्यांना ते मान्य करावे लागले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, फडणवीसांनी धक्कातंत्र वापरत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. तसेच, मी मंत्रिमंडळात नसेल पण माझा बाहेरुन पाठिंबा असेल असंही त्यांनी जाहीर करत मोठी बॉम्ब टाकला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही करण्यात आलं. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचं कौतुक करत त्यांना मोठ्या मनाचं म्हटलं. मात्र, त्यानंतर दोन तासात या संपूर्ण नाट्याला एक वेगळे वळण मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे निर्देश भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले. त्यामुळे या सर्व प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. त्यानंतर अमित शाह यांनीही ट्वीट करत याबाबत सांगितलं. तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना दोनवेळ फोन केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्विकार केला आणि शपथग्रहण केली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होत.
विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर तब्बल ११ दिवस चाललेल्या राजकीय नाट्याची आज अखेर झाली. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच समीकरण असल्याच्या चर्चा होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं होतं.
फडणवीस नाराज?
राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झाले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पडल्याचं अनेकांनी पाहिलं. त्यांची बॉडी लँग्वेजही नेहमीप्रमाणे दिसत नव्हती. त्यामुळे नड्डा-शाह यांच्या निर्णयावर फडणवीस नाराज असल्याचीही कुजबूज रंगली होती. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर अन्य मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास फडणवीस तयार झाले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0 Comments