Hot Posts

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे...

वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे...

                बेंबळे (कटुसत्य वृत्त): आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या व वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी होत आहे .

                वृत्तांत असा की 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून महाराष्ट्राच्या चोहोबाजूने अनेक गावच्या लहान मोठ्या दिंड्या व त्यांच्यासोबत शेकडो- हजारो वारकरी पंढरीकडे जात असतात. धुळे, जळगाव ,नाशिक ,नगर ,खान्देश या भागातून येणारे हजारो  वारकरी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, टेंभुर्णी ,करकंब मार्गे पंढरपूरला जात असतात. टेंभुर्णी, परिते ,बेंबळे ,घोटी,करकंब मार्गावर तसेच कुर्डूवाडी, रोपळे, आष्टी ,मोहोळ भागातून जाणाऱ्या सर्व मार्गावर उजनीचा डावा कालवा आहे .या सर्व येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी या भागात पाण्याची पुरेशी सोय होण्यासाठी अनेक वेळा उजनी डाव्या कालव्यातून यापूर्वी पाणी चालू ठेवलेले आहे .यावर्षी सध्या उजनी धरण ' मायनस' -10 (उणे - १०) दहा पातळीत असले तरी देखील  उजनी धरणात कालव्याच्या मुख्य दरवाजावर  तीन मीटर (अंदाजे दहा फूट) दाबाने पाणी उपलब्ध आहे. तसेच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर माळशिरस व पंढरपूर तालुक्यातून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी उजनीच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याचा, जलसंपदा विभाग, उजनी धरण नियंत्रण विभाग सोलापूर निर्णय घेत आहे व प्रत्येक वर्षी उजव्या कालव्यातून वारकऱ्यांसाठी पाणी सोडले जातेच. याच धर्तीवर जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यातून  किमान एक हजार क्यूसेक्स पाणी सोडावे व हजारो लाखो वारकऱ्यांची पाण्याची सोय करावी अशी रास्त मागणी डाव्या कालव्या लागत असलेल्या माढा ,मोहोळ ,व पंढरपूर तालुक्यातील अनेक गावातून होत आहे.

                पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसाने प्रचंड ओढ दिलेली असल्यामुळे  पंढरपूर कडे जाणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच मार्गावर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे . या भागातील ओढे , नाले, विहिरी, बोअरवेल यांची  पाणीपातळी खूपच खालावलेली दिसुन येत आहे ,त्यामुळे वारकऱ्यांच्या साठी पाण्याची सोय होणे अवघड पण महत्त्वाचे ठरणार आहे व म्हणून उजनीच्या डाव्या कालव्यातून तीन किंवा चार जुलै पासून ते अकरा  जुलै पर्यंत पाणी चालू ठेवणे आवश्यक  व महत्त्वाचे आहे.

                यावर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे अद्याप सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या सद्यस्थितीचा विचार करून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी उजव्या कालव्याप्रमाणेच डाव्या कार्यातूनही कमीत कमी पाचशे ते सहाशे क्यूसेक्स पाणी सोडण्याचे नियोजन विचाराधीन आहे. - धीरज साळे (अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर)

Reactions

Post a Comment

0 Comments