उजनी धरण 'मायनस',(-उणे) पातळीत...

आतापर्यंत 60 टीएमसी पाण्याचा वापर
मृत साठ्यातील 63 टीएमसी पाण्यातून यापुढे वापर होणार
बेंबळे (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याची भाग्य वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सोमवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 'मायनस', उणे (-)पातळीत आली असून आतापर्यंत धरणातील 60 टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे, तर यापुढे मृत साठ्यातील 63 टीएमसी पाण्यामधून सर्व क्षेत्रासाठी वापर होणार आहे. मागील 2021च्या 13 मे 21 रोजी दुपारी उजनी ची पातळी मायनस मध्ये आलेली होती.
मागील 2021 च्या पावसाळ्यात 15 ऑक्टोबर 21 रोजी उजनी धरणात 111.21 टक्के म्हणजेच 123.23 टीएमसी पाणी साठा तयार झालेला होता. 16 ऑक्टोबर 21 ते 6 जून 22 पर्यंत सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 47 साखर कारखाने, 14 एमआयडीसी, तसेच सिनारमास सारखे मोठे उद्योग धंदे व त्याचबरोबर शेकडो लहान उद्योग तसेच अनेक शहरे व शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना, लाखो एकर शेती, मोठ्या सिंचन योजना, कालवा व बोगदा याद्वारे आतापर्यंत एकूण 60 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. यापुढे राहिलेल्या 63 टीएमसी मृत पाणीसाठ्या मधून वापर होणार आहे व हा साठा 2022 च्या आगामी पावसाळ्यात धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास प्रारंभ होईपर्यंत वापरण्यात येणार आहे व या विपुल मृत साठ्यामुळे पाणी कमी पडणार नाही हे निश्चित. उजनी धरणा वरती असलेल्या मुळा,मुठा, पवना, इंद्रायणी, कुकडी, घोड या नद्यांमधून उजनीत पाणी येते व या सर्व नद्या व त्या वरती एकूण लहान मोठी 18 धरणे आहेत. यापैकी पानशेत, खडकवासला, पवना, आंध्रा, चासकमान, डिंबे व घोड या धरणामध्ये अद्यापही 12 ते 14 टक्के पाणीसाठा आहे तर टेमघर, कासारसाई, कलमोडी, भामा-आसखेडा, वडिवळे, नाझरे, पिंपळगाव जोगे ,येडगाव, वडज, विसापूर व माणिकडोह या 11 धरणामध्ये पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील दोन महिने कमी पडणार नाही असे सिंचन क्षेत्र पुणे विभागाकडून समजते.
उजनी धरण स्थापनेपासून आठमाही धरण म्हणून गणले जाते व त्यामुळे हे राज्यात सर्वात मोठा मृतपाणीसाठा असलेले धरण म्हणून ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्याचा विचार करता धरणाच्या भिंतीमध्ये असलेल्या मुख्य कालव्याचा दरवाज्यावर अद्यापही 4 मीटर पाण्याचा दाब आहे, तसेच मोठ्या सिंचन योजना अद्यापही चालू असून शेती, उद्योग व पिण्यासाठी आगामी दोन महिने पाणी कमी पडणार नाही अशी धरण नियंत्रण विभागाकडून माहिती मिळत आहे. सध्या 2022च्या पावसाळ्यास प्रारंभ झालेला आहे, पुणे जिल्ह्यात जून-जुलैमध्ये मोठे पाऊस होतात त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत मुळा-मुठा पवना इंद्रायणी इत्यादी मध्यावर असलेली लहान -मोठी धरणे भरून उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते व पाणीसाठ्यात वाढ होते. सोलापूर जिल्ह्यातही जुलै अखेर किंवा ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये मोठे पाऊस होतात त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडेल असे वाटत नाही .जलसंपदा विभाग सोलापूर च्या योग्य नियोजनामुळे सोलापूर जिल्ह्याला 2022 सालात आज पर्यंत पाणी कमी पडलेले नाही हे स्पष्ट दिसून येते.
उजनी धरणाची सोमवार दि.6 जून रोजी सायंकाळची स्थिती :-
- पाणी पातळी - 491.025 मिटर
- एकूण साठा - 1801.83 दशलक्ष घनमीटर 63. 62 टीएमसी
- उपयुक्त साठा :- उणे(-) 0.98 दशलक्ष घनमीटर
- उणे(-) 0.03 टीएमसी
- टक्केवारी उणे(-) 0.06 टक्के
धरणातून विसर्ग
- कालवा - 1000 क्युसेक्स
- भीमा- सीना बोगदा - 70 क्यूसेक्स
- सीना-माढा सिंचन योजना - 296 क्यूसेक्स
- दहिगाव सिंचन योजना - 88 क्यूसेक्स.
No comments:
Post a Comment