मार्कंडेय सहकारी रूग्णालयाची निवडणूक होणार जाहीर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील महत्वाच्या रूग्णालयामध्ये श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे नाव घेतले जाते. या रूग्णालयाची निवडणूक लागणार हे पक्के झाले असले तरी निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबत शहरवासियांना उत्सुकता आहे.
पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम ११ जूननंतर जाहीर होणार असून मंगळवारी (ता. 31) जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी रुग्णालयाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण १,७७९ मतदार आहेत.
मे महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या रुग्णालयाच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण २१ जणांच्या हरकती आल्या. या हरकतींवर २३ तारखेला सुनावणी झाली आणि मंगळवार, ३१ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
व्यक्तिगत सभासद यादीतून एकाचे आणि संस्थात्मक सभासद यादीतून दोघांचे असे एकूण तिघांचे नाव सभासद यादीतून जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी वगळले आहे.
एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार असून, रुग्णालयावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. व्यक्तिगत सभासद १६०८, संस्थात्मक सभासद १२४ तसेच डॉक्टर वर्गात सभासद ४७ असे एकूण १ हजार ७७९ सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
व्यक्तिगत गटातून ५ जागा, संस्थात्मक गटातून ५ जागा तसेच डॉक्टर गटातून ३ जागा, महिला गटातून २ जागा, अनुसूचित जाती गटातून १, इतर मागासवर्गीय गटातून १ तसेच भटक्या जमाती गटातून १ अशा एकूण १८ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक नियोजित आहे.
0 Comments