प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संचमान्यतेनुसार कराव्यात, ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषदांना आदेश

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या संचमान्यता झालेल्या नाहीत. यामुळे सद्यस्थितीत 2021-22ची संचमान्यता ही 2020-21 नुसार कायम ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला केलेली आहे.त्यानुसार 2022 मध्ये होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मागील वर्षीच्या (2020-21) संचमान्यतेनुसार कराव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी मागील आठवडय़ात ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित (संकेतस्थळ) करण्यात आली आहे. या प्रणालीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांना माहिती देऊन संबंधित संकेतस्थळाला दररोज भेट देऊन संकेतस्थळावरील कार्यवाहीची मर्यादा कटाक्षाने पाळाव्यात. मागील वर्षीच्या संचमान्यतेच्या आधारे यंदाच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. कोरोनामुळे बऱयाच जिल्हा परिषदांची बिंदुनामावली विभागीय आयुक्त, मागासगर्वीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नाही. त्यामुळे शासननिर्णयातील तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी तपासणी करून घेतल्यानुसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, याबाबतचे निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आले आहेत.
काही शिक्षकांच्या बदल्यांबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या शिक्षकांची बदली एका शाळेतून दुसऱया शाळेत करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी आधी या शिक्षकांची ऑफलाइन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत, तर काही शिक्षकांच्या बदलीबाबत न्यायालयाने विनंतीचा स्वीकार व्हावा, असे आदेश न्यायालयाने दिलेला असल्यास अशा शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळवावे आणि व त्यांची पोहोच जपून ठेवावी.
आंतरजिल्हा बदली प्रकरणात बदलीपात्र शिक्षकाकडे ज्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, त्या जिल्हा परिषदेकडील बिंदुनामावलीनुसार पद रिक्त असल्यास अथवा भविष्यात रिक्त होणारे पद असल्याचे ना हरकत प्रमाणात असल्यास अशा शिक्षकांचा 'ना हरकत' प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन, पदस्थापना ही ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावी, असे आदेशात नमूद केलेले आहे.
No comments:
Post a Comment