सांगोल्यात युवा कायदेविषयक जागृती कार्यक्रम ; युवकांना दिली कायद्याची माहिती
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सोलापूर, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कायदेविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत कॉलेजमधील तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थ्यांना सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरुपुर, सांगोला तालुका न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एस.के. देशमुख व न्यायाधीश उमेश पाटील उपस्थित होते.
न्यायाधीश श्री. मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी हा कायदा समजून घ्यावा व त्याचे पालन करावे, असे आवाहन केले. डॉ. गुरुपुर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व कर्तव्य यांची माहिती दिली. सिम्बॉयसिस लॉ स्कूलचे विद्यार्थी यशराजे साळुंखे-पाटील यांनीही लोकशाहीचे स्तंभ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका यांची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. डॉ. आशिष देशपांडे यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. योगेश धरणगुत्ती यांनी घरगुती हिंसाचार विरोधी कायदा 2005 अंतर्गत महिलांचे संरक्षण याविषयी विशेष मार्गदर्शन केले. डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी कामगार कल्याण कायदे, लोक अदालत यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात रोहित कुलकर्णी व दिनेश आयर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणीय कायदे, अन्नसुरक्षा कायदा, जनहित याचिका याबद्दल सोप्या भाषेत अवगत केले. कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेचे विश्वस्त एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित कोणालाही कायदा माहीत नाही या सबबीखाली कायद्याचे उल्लंघन करता येत नाही. सर्वांनीच कायद्याविषयी जागरूक होऊन कायद्यांचे पालन करावे.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. पी. सी. चव्हाण यांनी मानले.
0 Comments