संत सोपान महाराज पालखी तळाची प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली पाहणी
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- पालखी महामार्गाच्या कामांमुळे पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे रस्ता रुंदीकरणात काढण्यात आली आहेत. भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील संत सोपान महाराज पालखी तळ तसेच चांगावटेश्वर, चौरंगीनाथ महाराज यांचे पालखी कट्टे काढण्यात आले आहेत. संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजित जागेची आज प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपकार्यकारी अभियंता डी.व्ही.मुकडे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, संत सोपान महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी, तसेच भंडीशेगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संत सोपान महाराज मुख्य पालखी तळाच्या जागेची मोजणी करुन अहवाल सादर करावा. तसेच पालखी तळावरील अतिक्रमणे ग्रामपंचायतीने तत्काळ काढावीत व स्वच्छता करावी अशा सूचना गुरव यांनी दिल्या. पालखी तळासाठी पर्यायी जागा म्हणून भंडीशेगाव येथील जलसंपदा विभागाच्याही जागेची पाहणी केली. यावेळी त्या जागेवर असणारे बांधकाम व रिकाम्या जागेचा अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचना संबंधितांना गुरव यांनी दिल्या.
पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, अखंडीत वीज पुरवठा तसेच पालखी तळांवर प्रखर प्रकाश व्यवस्था आदी आवश्यक सोयी-सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गुरव यांनी यावेळी सांगितले.
0 Comments