स्वच्छता, अतिक्रमणे, स्वच्छ पिण्याचे पाणी ही कामे प्राधान्याने करा - प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी सोहळा पंढरपुरात 10 जुलै 2022 रोजी होणार आहे. या यात्रेनिमित्त राज्यातील इतर जिल्ह्यातून, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता, आरोग्य, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबतची कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या नियोजनाबाबत पूर्वतयारी करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात सर्व नगरपालिका विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्याधिकारी अरविंद माळी, स्वच्छता विभागाचे शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, बांधकाम विभागाचे रामचंद्र वाईकर, चिदानंद सर्वगोड, विद्युत विभागाचे संतोष क्षीरसागर, पाणी पुरवठा विभागाचे प्रीतम येळे, जाधव उपस्थित होते.
प्रांताधिकारी गुरव म्हणाले, यंदा आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी यात्रा कालावधीत सुमारे 15 ते 16 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. आषाढी वारी पावसाळ्याच्या कालावधीत पार पडत असून येणाऱ्या वारकरी व भाविकांना तसेच शहरातील नागरिकांना कोणत्याही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी वेळोवेळी स्वच्छता व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. वारीत भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करावा. यामध्ये अतिक्रमण मोहिमेचे दोन टप्पे करावेत, कायस्वरुपी अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावर विक्री करण्याऱ्या फेरीवाल्याचा भाविकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कचरा कुंड्यातील कचरा कुंडीच्या बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावरील चेंबरची कामे तत्काळ करावीत. चेंबर ओव्हरफ्लो होणार नाही, याबाबत दक्षता घेवून नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरातील रस्ते, अंतर्गत रस्ते यांची पाहणी करुन तत्काळ दुरुस्ती करावी. शहरातील मान्सूनपूर्व कामे तत्काळ सुरु करावीत, असेही गुरव यांनी सांगितले.
मुख्याधिकारी आविंद माळी म्हणाले, वारी कालावधीत मंदीर व मंदीर परिसर तसेच शहरात वेळोवेळी स्वच्छता राहिल यासाठी आरोग्य विभागाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना ठिकाणे निश्चित करुन द्यावीत. तसेच शहरात जंतनाशक फवारणी करुन घ्यावी. नालेसफाईची कामे तत्काळ सुरु करावीत. शहरातील सर्व चेंबरची झाकणे तपासावीत, ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे ती तत्काळ करुन घ्यावी. निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणची स्वच्छता व प्रखर प्रकाशाची व्यवस्था राहील याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे चेंबर झाकण्याची कामे संबंधित ठेकेदारांकडून तत्काळ करून घ्यावीत.
तसेच 65 एकर परिसरामध्ये मुक्कामास असलेल्या भाविकांनी कचरा इतरत्र न टाकता तो कचरापेटीतच टाकावा जेणेकरून तेथील कचरा उचलण्यास सुलभ होईल, असे आवाहनही श्री.माळी यांनी यावेळी केले.
0 Comments