दुकानांचा, आस्थापनांचा नामफलक मराठीत असावा
.jpg)
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिनियमातील कलम 36क अधिसूचनेव्दारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे. कलम 36 क (9) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, याची सर्व दुकानदारांनी, आस्थापनांनी नोंद घ्यावी.
आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र या नामफलकापूर्वी मराठी भाषेतील अक्षरलेखन आवश्यक असेल. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत, याचीही दक्षता संबंधितांनी घ्यावी. अधिसूचनेच्या अनुषंगाने सर्व विभागीय, जिल्हा व स्थानिक कार्यालयांमार्फत अंमलबजावणी करण्यात यावी.
0 Comments