सैनिक कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच्या मोहोळमध्ये 'अमृत जवान' अभियानास चांगला प्रतिसाद तहसीलदार बेडसे-पाटील यांची माहिती

मोहोळ (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र शासन व सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयाने राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक,शहीद जवान,जवान विधवा,जवान कुटुंबीय व सेवेत कार्यरत सैनिकांच्या शासकीय प्रलंबित कामाच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे ते १५ जून या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या 'अमृत जवान 'अभियानाला मोहोळमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत सैनिक कुटुंबीयांच्या सर्व प्रशासकीय विभागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी मोहोळ महसूल प्रशासन दक्ष असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी दिली.
देशाच्या सीमेवर सेवा करीत असताना त्यांना गावाकडील वैयक्तिक व कौटुंबिक दाखले व अन्य प्रशासकीय सोपस्काराच्या कार्यालयीन कामांना वेळ मिळत नाही. त्यामुळे शासकीय विभागात येणाऱ्या पंचायत समिती,ग्रामपंचायत,पोलीस विभाग,महसूल विभागाकडे फेरफार प्रलंबित,बिनशेती,बांधकाम परवानगी,भूसंपादन व पुनर्वसन,रेशन कार्ड,शेतामधील रस्ते,जमिनीची हद्दी यावरून होणारे फौजदारी स्वरूपाचे वाद मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीवकुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार,प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ महसूल विभाग या अभियाना अंतर्गत प्रयत्नशील आहे. या अभियानाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत सैनिक बांधवांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतः तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील, निवासी नायब तहसीलदार लीना खरात, नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.
देशासाठी लढलेल्या आणि सध्या कर्तव्य बजावत लढत असलेल्या सर्व सैनिक बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील समस्या दूर करण्यासाठी सैनिकांच्या कुटुंबियांचे अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या मागण्यांची पत्रे ज्या त्या विभागास सुपूर्द केली जात आहेत. अशा प्रकारे सैनिकांच्या कुटुंबीयांच्या समस्याचा निपटारा होण्यासाठी जास्तीत जास्त सैनिकांच्या कुटुंबीयांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन समस्यांचे निवारण करून घ्यावे. - प्रशांत बेडसे -पाटील (तहसीलदार मोहोळ)
0 Comments