लाकडी-निंबोडी योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील लाखो एकर क्षेत्राचे वाळवंट होणार...

उजनीतून शेतीसाठी फक्त एक आवर्तन मिळणारपिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणारसंघटितपणे संघर्ष करण्याची रयत क्रांती संघटनेची तयारी - प्राध्यापक सुहास पाटील
बेंबळे (कटुसत्य वृत्त): इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी ही उजनी धरणावर होणारी पाणीपुरवठा योजना आगामी एक- दोन वर्षांत कार्यान्वित होताच येत्या दहा वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्याचे वाळवंट होणार असून शेकडो गावातील लाखो एकर जमीन कोरडवाहू होणार आहे तर हजारो- लाखो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ येणार व पाण्याअभावी इतरही मोठी संकटे येणार हे निश्चित आहे.
यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यां पासून ते आमदार खासदार पर्यंत सर्व लोकप्रतिनिधीनी सामूहिक रित्या या योजनेस कडाडून विरोध करण्यासाठी ,राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी ,शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे या पुणे जिल्ह्यातील 'दादा-मामांचा' कुटिल डाव उधळून लावला पाहिजे अन्यथा भावी पिढ्या कोणालाच माफ करणार नाहीत व यासाठी रयत क्रांती संघटना आपले संपूर्ण योगदान देण्यास व संघर्ष करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील यांनी केले आहे. मागील वर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजना मंजुरीसाठी प्रयत्न करताच त्यांना सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेने विरोध केला होता परंतु सर्व काही गुप्त रित्या करून चालू अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 350 कोटी रुपये मंजूर केले व दोन वर्षाच्याआत इंदापूर तालुक्यातील चौदा गावे व बारामती तालुक्यातील सात गावचे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निश्चय केला आहे. लाकडी निंबोडी योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास शासनाने मंजुरी दिली आहे व हे पाणी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड व परिसरातून येणारे सांडपाणी प्रक्रिया करून योजनेसाठी वापरणार असल्याचे सांगून पुणे जिल्ह्यातील 'दादा- मामानी' तमाम सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. ही योजना कार्यान्वित होताच इंदापूर व बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दहा ते पंधरा टीएमसी पाणी निश्चितपणे उचलून घेतले जाईल व या वेळी सत्ताधाऱ्यांना कोणीही अडवू शकणार नाही कारण 'ज्याच्या हाती ससा तो पारधी असतो' हा अलिखित नियम आहे.
सोलापूर जिल्ह्यावर जबरदस्त परिणाम...
पावसाळ्यात उजनी धरण 111.21 टक्के पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर यामध्ये 123 टीएमसी पाणीसाठा होत असतो. यामध्ये 60 टीएमसी जिवंत पाणी साठा असतो तर 63 टीएमसी मृत पाणीसाठा असतो. या धरणाच्या उचल पाण्यावर पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील 18 एमआयडीसी, 63 साखर कारखाने, पाणी पुरवठा योजना, सिनारमास सारखे मोठे उद्योग धंदे व अनेक लहान-मोठे उद्योग कायम चालू असतात,व त्यांना मंजुरी पेक्षा जास्त पाणी वापरले जाते . धरणातील जिवंत पाणीसाठयातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी मुख्य कालवा २० कि.मी पुढे डावा १२६ कि.मी व उजवा १२२ कि.मी. कालवा, भीमा- सीना जोड कालवा ( बोगदा) या मधून नियोजनाद्वारे रब्बी हंगामात एक महिन्यासाठी एक व उन्हाळी हंगामात प्रत्येक तीस दिवसाची दोन अशी एकुण तीन आवर्तने (रोटेशन )दिली जातात. यातील कालव्याचे प्रत्येक आवर्तन पाच ते सहा टीएमसी असते तर बोगद्याचे आवर्तन हे सीना नदीतील बंधारे भरण्यावर अवलंबून असते. तसेच धरणातील पाण्यावर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, टेंभुर्णी अशा अनेक शहराच्या व शेकडो गावातील तसेच वाड्या-वस्त्या सहित लाखो नागरिक व पशुधनाची पिण्याच्या पाण्याची सोय होते आहे. लाकडी- निंबोळी योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरी ही शुद्ध धूळफेक असुन या योजनेद्वारे दहा ते पंधरा टीएमसी पाणी निश्चित उचलले जाईल व या मुळे सोलापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामात एक आवर्तन मिळेल किंवा उन्हाळी हंगामात एक आवर्तन मिळेल व तीन पैकी दोन आवर्तने रद्द होऊन जातील, कारण धरणाच्या भिंतीत असलेल्या कालव्याच्या दरवाजाचि तळ पातळी, लाकडी निंबोणी योजनेतून पाणी उचलल्यामुळे पाणीसाठा कमी होउन केव्हाच उघडी झालेली असेल, मात्र लाकडी निंबोडी सारख्या उचल पाणी घेणाऱ्या योजनेला किंवा सिनारमास सारख्या उद्योगधंद्यांना पाणी कधीच कमी पडणार नाही. सोलापूर जिल्ह्याला मात्र पाण्याच्या फक्त एका आवर्तनावर थांबावे लागेल व मुख्य कालवा तसेच डावा कालवा व उजवा कालवा यावरून सध्या ओलिताखाली आसलेले साडेसात लाख एकर क्षेत्र पाण्यावाचून कोरडे राहणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे., तसेच लाखो लोकांना व पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ येणार आहे, जिल्ह्यातील साखर कारखाने, उद्योगधंदे, व शेती पूरक धंदे बंद पडणार आहेत, हजारो-लाखो नागरिक बेरोजगार होणार आहेत व सोलापूर जिल्हा सर्व बाजूंनी भकास होणार आहे हे निश्चित.
यासाठी जिल्ह्यातील जनतेने आता जागे व्हायला पाहिजे ,आपल्या जिल्ह्यातील पुढारी हे वैयक्तिक मोठेपणा घेण्यासाठी सतत एकमेकांच्या वरती कुरघोडी करताना दिसतात परंतु आता जनतेनेच रस्त्यावर उतरून या पुणे जिल्ह्यातील' दादा- मामांच्या' कुटील कारस्थानाचा नायनाट केला पाहिजे, यासाठी जनतेच्या, शेतकऱ्याच्या बरोबर रयत क्रांती संघटना सदैव आपले मोलाचे योगदान देण्यास नेहमीप्रमाणे तयार आहे असेही ठाम प्रतिपादन प्राध्यापक सुहास पाटील यांनी केले आहे.
वीजेची पळवापळवी...
उजनी धरणावर मागील कित्येक वर्षापासून 12 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हद्दीत विद्युत केंद्र उभारण्यात आले आहे, परंतु वीज मात्र पुणे जिल्ह्यात पळउन नेलेली आहे. उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुद्धा केवळ निधीअभावी या योजना रखडल्या आहेत परंतु लाकडी निंबोळी योजनेला मात्र 350 कोटी एकाच वेळेस मंजुरी मिळत आहे, याबाबत कोणताही नेता कधी आवाज उठवत नाही आणि जर आवाज उठवला तर राजकारणी पवार हे ना. दत्तात्रय भरणे सारख्याला हाताशी धरून आपले राजकीय डाव पेच यशस्वी करतात व सोलापूर जिल्ह्यातील जर कोणी आवाज उठवला तर त्याच्या मागे असा काही ससेमिरा लावतात की त्यांनी नाक मुठीत धरून पवारांना शरण गेले पाहिजे व त्यांचे बरोबर जिल्ह्यातील जनतेलाही हेच करण्याची दिशा दाखवली जाते.
तेव्हा आता यापुढे शांत बसाल तर मरणप्राय यातना भोगाव्या लागतील व भावी पिढ्या कधीही क्षमा करणार नाहीत हे निश्चित असेही प्राध्यापक पाटील यांनी भावनाविवश होउन प्रतिपादन केले आहे. तमाम जनतेने व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून संघटितपणे उजनी धरणातील पाणी पळवणार्या चोरांना सोलापूर जिल्ह्याची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे व यासाठी रयत क्रांती संघटना आपले योगदान देण्यासाठी सदैव तयार असल्याचे प्राध्यापक पाटील यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment