शिक्षणाचा अधिकारानुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पहिल्या निवड यादीनुसार मुलांचा प्रवेश दिला आहे. आता वेटिंग लिस्टमधील मुलांसाठी ऑनलाइन पध्दतीने एसएमएस पाठवण्यात आले आहेत. त्या मुलांचे प्रवेश २७ मेपर्यंत देण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात ३०६ शाळा आहेत. त्यामध्ये पहिली निवड यादी ३० मार्चला प्रसिध्द करून त्यामध्ये १८८० जणांची निवड झाली होती. १३७६ जणांचे प्रवेश निश्चित झाले असून १० मेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती. प्रत्यक्षात ४९० जणांना शिक्षण विभागाकडून फोनद्वारे संपर्क करूनही त्यांनी प्रवेश घेण्यासाठी अप्रोच झाले नाहीत. आता वेटिंग लिस्टमधील मुलांचा विचार केला जात आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना त्यांच्या लॉगीनमध्ये अलॉटमेंट लेटर प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जावून पडताळणी समितीकडून तपासणी करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे.प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जावे आणि प्रवेश घ्यावा. रेटिंग लिस्टवरच्या पाल्यांना एसएमएस आले नाहीत तर पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती पाहून घ्यावी, असे कळवले आहे.
0 Comments