Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात ओबीसी आरक्षणासहच होतील - शरद पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात ओबीसी आरक्षणासहच होतील - शरद पवार


              मुंबई (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात ओबीसी आरक्षणासहच होतील. त्यासाठी कोणाच्या दयेची गरज नाही; तो आपला अधिकारच आहे. जातीनिहाय जनगणना हाच त्यावरचा उपाय असून केंद्राने ती करावी, यासाठी आपण सर्व मार्गांनी लढू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे मांडली. राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. पवार म्हणाले, 'ओबीसी समाजाची लोकसंख्या नक्की किती, हे मोजून ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करायला हवी, असा जो ठराव आजच्या अधिवेशनात करण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे.एकदा जातीनिहाय जनगणना झाली की, त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करणे सोपे जाईल.'भाजपा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता पवार यांनी टीका केली.ते म्हणाले, आज भाजपाचे नेते, माजी मुख्यमंत्री सांगतात की, महाविकास आघाडीने धोका दिला,पण पाच वर्ष तुमच्या हातात सत्ता असताना आणि केंद्रात असताना तुम्ही झोपला होता का? तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.आज भाजपाचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे.या लोकांकडून ओबीसींना न्याय मिळेल, याची कोणतीही शक्यता नाही.बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ओबीसींच्या जातगणनेचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते भाजपाचे सहयोगी आहेत. तरीही त्यांनी जातीनिहाय जनगणना मुद्दा मांडला. पण केंद्रातले हे सरकार असेपर्यंत ते होईल, असे मला वाटत नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आजही आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निकाल दिला असला तरी न्यायालयाच्या चौकटीत बसवून आरक्षणासहीत निवडणुका घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेत आपल्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे व मी पूर्णपणे तत्पर आहोत. ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments