ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे वनीकरणाला लागलेली आग विझविण्यास ग्रामस्थांना यश
पोलीस पाटलाचा चाणाक्षपणा ठरला लाभदायक
लऊळ (कटुसत्य वृत्त): येथील कूर्मदास मंदिराजवळील माळरानावर असलेल्या सामाजिक वनीकरण परिसरात अचानक पेटलेली आग विझवण्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे ग्रामस्थांना अखेर यश मिळाले.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे सायंकाळी सहाच्या सुमारास माजी सैनिक प्रताप जानराव हे व्यायाम करण्यासाठी सामाजिक वनीकरण शेजारी असलेल्या मैदानावर गेले असता त्यांना आगीचे लोट दिसले. जानराव यांनी लगबगीने मित्रांना सदर आगीचे चित्रीकरण करून पाठविले व मदतीचे आवाहन केले.काही वेळातच आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला.याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांना समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत व्यायामासाठी आलेले नागरिक, तरुण यांचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.परंतु काही केल्या आग आटोक्यात येत नव्हती.प्रसंगावधान गाठून लोकरे यांनी गावच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन लावला.काही वेळातच गावातील तरुण तसेच प्रतिष्ठित नागरिक घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली.ग्रामस्थांकडून याप्रसंगी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले जात आहे. त्याबरोबर ग्रामसुरक्षा यंत्रणा आपत्ती प्रसंगी किती लाभदायक ठरू शकते याचीही चर्चा ग्रामस्थांमधून सुरू आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.वाढते जागतिक तापमान याचा विचार करून आणि वृक्षांचे महत्व समजून शासन लाखो रुपये खर्च करून वनीकरण करत आहे.परंतु एकदा झाडे लावून झाली की तिकडे फारसे लक्ष दिले जात नाही अशीही चर्चा गावकट्टयावर रंगत आहे.
अग्निशामक दलाची गाडी आलीच नाही
अचानकपणे लागलेली आग विझवण्यासाठी एका सुज्ञ नागरिकाने फोन केला.परंतु अग्निशमन दलाच्या गाडीची बॅटरी डाऊन असल्याचे कारण देत हात वर केले.
ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू केल्याचा फायदा
बऱ्याच दिवसांपासून गावचा ग्रामसुरक्षा यंत्रणेचा नंबर बंद होता.परंतु चोऱ्यांचे वाढते प्रमाण यामुळे सेवा सुरळीत करण्यात आल्याने मोठी हानी टळली.
0 Comments