काँग्रेसच्या "नवसंकल्प" चिंतन शिबिरातील योगदानाबद्दल आ. शिंदेंचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने 13 मे ते 16 मे पर्यंत उदयपूर राजस्थान येथे "नवसंकल्प" चिंतन शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात कॉंग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, कॉंग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह देशातील विविध महत्त्वाच्या पदावर असणारे चारशे कॉंग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. या नव संकल्प चिंतन शिबिरात काँग्रेस पक्ष राजकीय सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी, देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी, देश आणि संविधान वाचविण्यासाठी, तसेच देशात सातत्याने घटत चाललेली सामाजिक सलोखा, अनियंत्रित महागाई, खालावलेली अर्थव्यवस्था आणि इतर अनेक जनविरोधी घटनांवर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसने तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबिर' आयोजित केले होते.
उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या 'नवसंकल्प चिंतन शिबिर'च्या दृष्टीने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी आणि कृषी आणि युवा आणि सक्षमीकरणाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी समन्वय समित्या स्थापन केल्या होत्या या समित्यामध्ये महाराष्ट्रातून फक्त तीन सदस्य नेमले होते त्यात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे हे होते.
या महत्वपूर्ण अश्या अर्थव्यवस्था समितीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग होता. या अर्थव्यवस्था कमिटीच्या बैठकीत राहुलजी गांधी, पी. चिदंबरम, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, सचिन पायलट, मनीष तिवारी, राजीव गौडा, गौरव वल्लभ, सुप्रिया श्रीनेत सह इतर सहयोगी यांच्यासोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी देशातील सध्याची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, रुपयाचे घसरते मूल्य, विक्रमी महागाई यासह विविध विषयांवर चर्चा केली.
या नवसंकल्प शिबिरामुळे काँग्रेसच्या संघटनेत महत्वपूर्ण बदल घडवून पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर खरी उतरेल. जनतेचा विश्वास जिंकण्याबरोबरच अधिकाराची लढाई अधिक ताकदीने लढेल. काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पातळीवर “कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो’ ही यात्रा कॉंग्रेस सुरू करणार आहे आणि प्रत्येकजण त्यात सहभागी होईल, त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई सारख्या मुद्यांवर भर दिला जाईल, आणि काँग्रेस पक्षाचे जनतेशी असलेले नाते जे होते आणि आहे ते नाते अधिक दृढ करेल.
कॉंग्रेस पक्षाच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरणाऱ्या या "नव संकल्प" शिबिरातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, गोवर्धन कमटम, तिरुपती परकीपंडला, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, प्रमिला तुपलवंडे, वाहिद बिजापुरे, सुशील बंदपट्टे, सुमन जाधव, रामसिंग आंबेवाले, सागर शहा, महेश जोकारे, शिल्पाताई चांदणे, उज्वलाताई ढेकळे, शोभाताई बोबे, वीणाताई देवकते, नीता बनसोडे, चंदाताई काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments