महापालिका कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने कारवाई करा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा पुढील दोन महिन्यात अनुसूचित जाती कल्याण समितीच्या दौऱ्यात प्रश्न उपस्थित झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कालबध्द पध्दतीने तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवा, अशी सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी येथे केले.आमदार शिंदे यांनी महापालिकेत सफाई कामगार प्रश्नाबाबत बैठक घेतली. बदली, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी नगरविकास खात्याने प्रस्ताव मागितले असताना वेळेवर पाठवले जात नाहीत, या स्थितीकडे शिंदे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते दोन दिवसांत पाठवण्यास त्यांनी सांगितले. तसेच पाच दिवसांत लाड पागे योजनेतील नियुक्त्या कराव्यात. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून अनुदान येत असते. तशी सोय केली जात नाही.सफाई कर्मचाऱ्यांकरीता सात रस्ता किंवा शास्त्रीनगर येथे घरकुल योजना राबवा. राजेशकुमार मीनानगर येथील घरकुल कर्मचाऱ्यांच्या नावाने करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुुरावा करण्याबाबत चर्चा झाली.प्रस्ताव लवकर पाठवू, असे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले. या वेळी माजी नगरसेवक चेतन नरोटे, प्रवीण निकाळजे, बाबा करगुळे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले, सायमन गट्टू, बाली मंडेपू, योहान कानेपागुलु आदी उपस्थित होते.
0 Comments