भाजपने सत्ता मिळाल्यानंतर पाच वर्षांत महापालिकेचा बट्ट्याबोळ केला

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी महापालिका निवडणुकीत माकप महाविकास आघाडीसोबत जाणार आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. अशी माहिती माकपचे नेते,माजी आमदार नरय्या आडम यांनी बुधवारी येथे पत्रकारांना दिली. भाजपने सत्ता मिळाल्यानंतर पाच वर्षांत महापालिकेचा बट्ट्याबोळ केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी राज्य सचिव उदय नारकर उपस्थित होते. दत्त नगर येथील माकप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.काॅ. आडम म्हणाले की, माकपने काही मुद्यांवर आघाडीला पाठिंबा देऊ केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही मुंबईत चर्चा झाली आहे.काॅ. आडम म्हणाले की, दररोज पाणीपुरवठा करू अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपला चार दिवसांआड पाणीपुरवठा करणेही शक्य झाले नाही. खरे तर ११ लाख लाेकसंख्या आहे. प्रत्येकी १३५ लिटर पाणीपुरवठा अगदी रोज करू शकू इतकी सक्षमता यंत्रणेत आहे. तेही जमू शकलेले नाही. स्थायी समितीचे सभापतिपद अडीच वर्षे रिकमे राहिले. त्यांच्या गटबाजीची किंमत शहरवासीयांना चुकवावी लागली. शहर भकास झाले. आघाडीसोबत जाण्याविषयी चर्चा झाली आहे. निर्णय झाला तर ठीक नाही तर स्वबळावर लढायची माकपची तयारी आहे. आघाडी नाही झाली तर माकप महापालिकेच्या किमान ४० जागांवर निवडणूक लढवेल, असेही काॅ. आडम यांनी स्पष्ट केले. यातील किमान २२ जागा आम्ही जिंकू, असा दावाही त्यांनी केला.
0 Comments