तिसरी आणि पाचवीचे विद्यार्थी राज्यात प्रथम आल्याची माहिती-प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे आयोजन १२ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला असून, यात यात देशातील एकूण ७२२६ शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात तिसरी आणि पाचवीचे विद्यार्थी राज्यात प्रथम आल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूरचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांनी दिली.इयत्ता तिसरीची सर्व विषयांची एकत्रित संपादणूक ६३.४ टक्के तर सोलापूर जिल्हा सर्व विषयांची एकत्रित संपादणूक ७३.२ टक्के आहे. इयत्ता तिसरी आणि पाचवीमध्ये सर्वाधिक टक्केवारी मिळवत सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.नवी दिल्ली एनसीईआरटी यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातून इयत्ता तिसरीचे ४७, पाचवीचे ४२,आठवीचे ८१ व दहावीच्या ७१ शाळांची निवड रॅन्डम पद्धतीने करण्यात आलेली होती.या परीक्षांसाठी डाएटचे सर्व अधिव्याख्याता यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली त्याची ही फलनिष्पत्ती आहे.या परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता डाएटचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.शिवाय इयत्ता पाचवी सर्व विषयांची एकत्रित संपादणक ५१.९ टक्के व सोलापूर जिल्ह्याची सर्व विषयांची एकत्रित संपादणूक ६०.७ टक्के आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रेरणेतून व डाएटच्या मार्गदर्शनातून झाडाखालची शाळा, पारावरची शाळा, गृहभेटी, ऑनलाईन शिक्षण असे विविध मार्गानी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अध्ययन घडवून आणले त्याची ही फलनिष्पती आहे, असे मत डॉ. रामचंद्र कोरडे यांनी व्यक्त केले.
0 Comments