महापालिकेने शहरातील अनेक मिळकतधारकांना चुकीच्या पद्धतीने मिळकत कर वाढवून त्यांना नोटिसा बजावल्या
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेने शहरातील अनेक मिळकतधारकांना चुकीच्या पद्धतीने मिळकत कर वाढवून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.लादण्यात आलेले हे वाढीव मिळकत कर थांबविण्यात यावे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांबरोबर झालेल्या कौन्सिल हॉल येथील बैठकीत सांगितले. यासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी त्यांना सांगितले.शहरातील विविध प्रश्न आणि महापालिका कामगारांसंदर्भातील प्रश्नांवर आ. प्रणिती शिंदे यांची महापालिका आयुक्तांसमवेत बुधवारी बैठक झाली. यानंतर आ. शिंदे यांनी झालेल्या बैठकीतील नवीन प्रश्नासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी घाईगडबडीत यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नोंदी घेऊन शहरातील अनेक मिळकतदारांना रिव्हिजनच्या नावाखाली दुप्पट-तिप्पट व त्यापेक्षाही अधिक करवाढीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे ज्या मिळकतदारांचे कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही त्यांना या चुकीच्या पद्धतीने मिळकत करवाढ लादण्याचा प्रकार होणार आहे. हे त्वरित थांबवून अशा प्रकारची करवाढ थांबविण्यासंदर्भात व करवाढ करावयाची असेल तर सरसकट पद्धतीने करावी,जेणेकरून यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, असे आयुक्तांना सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच शहरातील पाण्याचा प्रश्न तातडीने नियोजन आखून मिटविण्याचा व विस्कळीतपणा दूर करून व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यावरही चर्चा झाली. रमाई आवास योजना यासह इतर संदर्भात बैठकीत चर्चा करून त्यावर निर्णय होण्याच्या सूचना केल्या.याबरोबरच महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करून त्यावरील कार्यवाहीसंदर्भात निर्णय घेण्याचे बैठकीत सांगितले.विविध संवर्गातील २५ ते ३० वर्षापासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना व २२ वाहन चालकांना सेवेत कायम करण्यासंदर्भात झालेल्या बैठकानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, २०११ च्या शासन निर्णय परिपत्रकानुसार महानगरपालिकेच्या सन १९९६ च्या बोर्डात ठराव केल्यानुसार झाडूवाली, सफाई कर्मचारी,गटार बिगारी,आया,मलेरिया विभागाकडील मूलमंत्रशी निगडित जे कर्मचारी आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या fim. वारसदारांना सन १९९६ पासून लाड - पागे समिती लागू करावी,सफाई कर्मचाऱ्यांच्या दोन वसाहत एकाच ठिकाणी बांधून मिळणे किंवा वसाहतीसाठी ६ एकर जागा आरक्षित होऊन मिळावी,या विषयावर आयुक्तांबरोबर चर्चा झाली असून यावर लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले असल्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासमवेत महापालिका माजी गटनेते चेतन नरोटे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले,काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष सायमन गट्ट,संघटनेचे बाली मंडेपू व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments