देशात येत्या २ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींवर जाईल": नितीन गडकरी
पुणे (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही महिन्यांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी असल्याचे दिसत आहे.दुचाकीपासून ते अगदी प्रवासी, मालवाहतूक क्षेत्रातील चारचाकींपर्यंत अनेकविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने देशात मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पेट्रोल-डिझेलला पर्याय आणि प्रदुषण कमी होण्यासाठी सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यातच आता, देशात आगामी दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींपर्यंत जाईल, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तब्बल १३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या १२ लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा ४० लाखांपर्यंत जाईल. तर येत्या दोन वर्षात ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात खूप वाव असून या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे पाठबळ असलेल्या पाच नवउद्यमींच्या (स्टार्टअप) अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.सध्या देशात सेमीकंडक्टर तुटवडा आहे. हे सेमिकंडक्टर धुण्याच्या यंत्रापासून चारचाकीपर्यंत सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे आपल्या ऑटोमोबाइल निर्यातीला फटका बसला आहे. देशात होणारे संशोधन प्रत्येक जिल्हा, प्रदेशाच्या गरजेनुसार झाले पाहिजे. तसेच देशाची भविष्यातील गरज काय, आपण आयात काय करतो आणि काय निर्यात करू शकतो, याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यादृष्टीने संशोधन झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे गडकरी यांनी सांगितले.विजेवर चालणाऱ्या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेने पर्यायी ॲल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, ॲल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झाले आहे. परिणामी आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांना खूप वाव असणार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.दरम्यान, पुण्यात दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेले समृद्ध राष्ट्र आहोत. १९४७ नंतर चुकीची आर्थिक धोरणे, वाईट आणि भ्रष्ट कारभार आणि अदूरदर्शी नेतृत्व यामुळे आपले मोठे नुकसान झाले. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारताची चर्चा करतो, आपण आनंदी, समृद्ध आणि शक्तिशाली भारताची चर्चा करतो, असे गडकरी म्हणाले.
0 Comments