पालखी मार्गावरील पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करणार - सीईओ दिलीप स्वामी
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रा कालावधीत पालखीमार्गावरील सर्व विहिरींतील पाण्याच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. आरोग्य सुविधांसाठी मोबाईल आरोग्यदूत व स्वच्छतेसाठी स्वच्छतादूत देण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींमधील तयारीची पाहणी आज सीईओ दिलीप स्वामी यांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपअभियंता एस. एन. लवटे उपस्थित होते. दिलीप स्वामी यांनी गोपाळपूर येथे गोपाळ काला होत असलेले ठिकाण, गोपाळपूर हद्दीतील दर्शन रांग, पाण्याची सुविधा इतर सुविधांची पाहणी केली.
गोपाळपूरला जागा यात्रा अनुदान
पांडुरंगाच्या दर्शनानंतर भाविक मोठय़ा प्रमाणावर येतात. आषाढी यात्रा कालावधीत गोपाळपूर येथे दर्शन घेऊन भाविक दर्शन रांगेत जातात. या सर्व बाबी लक्षात घेता आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोपाळपूरला यात्रा अनुदान देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना निधी प्राप्त होईपर्यंत उपलब्ध निधीतून खर्च करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. गोपाळपूर येथे सरपंच विलास मस्के, दिलीप गुरव, उपसरपंच उदय पवार, ग्रामसेवक जयकुमार दानोळे यांनी व्यवस्थेची माहिती दिली.
पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण
पालखीमार्गापासून 200 मीटर आतपर्यंतच्या सर्व विहिरी व पाण्याचे स्रोत शुद्ध करण्यात येणार आहेत. भाविक कुठल्याही विहिरीवर गेला तरी त्यांना अडचण येणार नाही. आरोग्य विभागास तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे दिलीप स्वामी यांनी सांगितले.
हॉटेल्ससाठी परवानगी बंधनकारक
पालखीमार्गावर तात्पुरत्या स्वरूपात जी हॉटेल्स उभारली जातील, त्यांना परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परवानगी बंधनकारक असणार आहे, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
भाविकांच्या सोयीसाठी आरोग्यदूत व स्वच्छतादूत
पालखीतळ, तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणारी शौचालये येथे भाविकांना साहाय्य करण्यासाठी स्वच्छतादूत नेमण्यात येणार आहेत. त्यांना टी-शर्ट व आयकार्ड देण्यात येणार आहेत. स्वच्छतादूतसाठी ग्रामपंचायतींना नावे देण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment