महागाई आटोक्यात आणण्यात मोदी सरकार अपयशी - हेमंत पाटील

मुंबई, (कटुसत्य वृत्त): देशातील बहुतांश राज्यात पेट्रोलचे दर १२० रुपये लिटर पर्यंत पोहचले आहेत.घरगुती गॅस सिलेंडरच्या दराने हजार रुपयांपर्यंत उच्चांक गाठला आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाईचा वणवा पेटला आहे. पंरतु, महागाईच्या वणव्याच्या झळा सर्वसामान्यांना बसत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्दही काढत नाहीत,ही बाब अत्यंत चिंताजनक तसेच खेदजनक आहे.. यावरुन महागाई आटोक्यात आणण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' ऐवजी सर्वसमान्यांच्या मनातील गोष्ट ओळखावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केले.
गेल्या दोन वर्षात पेट्रोल ६९.५९ रुपये लिटरवरून १२० रुपये लिटरपर्यंत पोहचले आहे.दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाली होती.तरी,देखील सरकारी तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकारकडून कुठल्याही प्रकारची कर कपात करण्यात आली नव्हती. आता मात्र तुटपुंजी कर कपात करून पंतप्रधान महागाईचे खापर राज्यांवर फोडत आहेत. त्यांचे आणि भाजपचे हे दुटप्पी धोरण नागरिकांच्या लक्षात आले आहेत.
मे २०२० मध्ये घरगुती गॅस सिलेंडर ५८१.५० रुपयांना मिळत होते. पंरतु, दोन वर्षांमध्ये या किंमतीत वाढ होवून ९९९.५० रुपयांना घरगुती सिलेंडर नागरिकांना घ्यावे लागत आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महारोगराईमुळे सर्वसामान्य पिचला गेला आहे. आता महागाईच्या 'सुल्तानी' संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचे स्वप्न भंग केले आहे.त्यामुळे मोदी सरकारने जनतेची माफी मागावी,अशी मागणी देखील पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे मोदी सरकारने महागाई आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.लवकरच महागाई कमी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी दिल्ली दौरा करणार असून विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याची माहिती पाटील यांच्यावतीने देण्यात आली आहे.
0 Comments