उपचाराकरीता उपलब्ध खाटांची माहिती पोर्टलवर वेळोवेळी प्रसिध्द करावी-प्रवीण सोनवणे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गरजु रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये कोणत्या रूग्णालयांचा समावेश आहे. तेथील उपलब्ध खाटांची संख्या माहित नसल्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या खासगी,शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरीता उपलब्ध खाटांची माहिती पोर्टलवर वेळोवेळी प्रसिध्द करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या योजनेतंर्गत पिवळ्या शिधापत्रिका धारकांना अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाना तसेच शेतकरी, जिल्ह्यातील आत्महत्याग्रहस्त शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. त्याचबरोबर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी,महिला आश्रमातील महिला, अनाथालये, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृती धारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंबे व अन्य लाभार्थी या योजनेस पात्र लाभार्थी आहेत. या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय, निमशासकीय,खाजगी तसेच धर्मादाय संस्थांच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना अधिन राहून करण्यात आली आहे.लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगिकृत रूग्णालयात उपचार घेऊ शकतात. या योजनेमध्ये ३१ विशेष सेवांतर्गत ११०० उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२७ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. परंतु असे असताना, गरजु रुग्णांना या योजनेमध्ये कोणत्या रूग्णालयांचा समावेश आहे. येथील उपलब्ध खाटांची संख्या माहित नसल्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे.त्यामुळे संबंधित माहिती पोर्टलवर प्रसिध्द करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
0 Comments