Hot Posts

6/recent/ticker-posts

पैशांपेक्षा आमचे आरोग्य महत्वाचे तृतीयपंथीयांची प्रतिक्रिया

पैशांपेक्षा आमचे आरोग्य महत्वाचे तृतीयपंथीयांची प्रतिक्रिया

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठीच्या एकदिवशीय शिबीराचे उद्घाटन

            सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- आम्ही पण माणूस आहे, आम्हाला समाजाने माणुसकीची वागणूक द्यावी. आमच्याकडे तुच्छतेने बघू नका. आम्हाला पण पैशांपेक्षा आरोग्य महत्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या.

            तृतीयपंथीय व्यक्तीसाठी शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र,ओळखपत्र आवश्यक आहे. समाज कल्याण विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने त्यांना प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता येथे गुरूवारी सकाळी 11 वाजता एकदिवशीय शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्या हस्ते झाले. तृतीयपंथीयांनी शिबीरात सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आढे यांनी केले.

            तृतीयपंथीयांना शासकीय लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. शिबिराद्वारे समाज कल्याण विभागाच्या सहयोगाने त्यांना केंद्र सरकारच्या https:transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर माहिती भरण्यास मदत करण्यात येत आहे. वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण मारडकर यांनी सर्वांना नोटरीचे काम मोफत करून दिले. समाज कल्याण विभाग, निरामय आरोग्य धाम आणि क्रांती महिला संघ यांच्या मदतीने ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे.

            आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, फोटो, नोटरी केलेला स्टॅम्प पेपर हे वेबपोर्टलवर ऑनलाईन भरून प्रिंट काढली जात आहे. प्रिंट काढून जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन पुन्हा अपलोड करून प्रमाणपत्र मिळणार आहे. दुपारपर्यंत 23 तृतीयपंथीयांचे अर्ज अपलोड करण्यात आले होते. या ओळखपत्रामुळे लाभ संजय गांधी निराधार योजना यांच्यासह अन्य योजनेसाठी होणार आहे.  शिबीरात तृतीयपंथीयांनी आरोग्य सुविधेसह घरकुल मिळण्याची मागणीही केली.

            महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नागेशकुमार गंजी यांनी तृतीयपंथीयांना मार्गदर्शन केले. तृतीयपंथीयांनी आपल्याबरोबर इतरांनाही ओळखपत्र मिळण्यासाठी मदत करावी. यावेळी समाज कल्याणच्या विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे, निरामय संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी शिंदे, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, प्रकल्प अधिकारी, समतादूत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका समन्वयक उमेश पुजारी यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments