अनगरला 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजुर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची मंजुरी बाळराजे पाटील यांची माहिती

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगर परिसरातील ग्रामीण रुग्णांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा शासकीय स्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यशासनाने अनगर येथे तीस खाटांच्या सुसज्ज आणि अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली असून या मंजुरीचा आदेश शासनाने काढला असल्याची माहिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि. प. सदस्य बाळराजे पाटील यांनी दैनिक कटूसत्यसी बोलताना दिली.
यावेळी माहिती देताना बाळराजे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बहुमोल सहकार्यामुळे आणि माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आ. यशवंत माने यांच्या अविरत पाठपुराव्यामुळेच या अदयावत ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाल्याची कृतज्ञताही यावेळी बाळराजे पाटील यांनी व्यक्त केली. अनगर पंचक्रोशीमध्ये सध्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांची संख्या पाहता या भागातील ग्रामीण रुग्णांसाठी राज्य शासनाच्या ग्रामीण रुग्णालय दर्जाच्या आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय दवाखान्याची नितांत गरज होती असेही यावेळी बाळराजे पाटील म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,अनिल कादे, भारत सुतकर, बाजार समिती सभापती असलम चौधरी, जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, सभापती रत्नमाला पोतदार, नागेश साठे, प्रशांत बचुटे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ मे रोजी अनगर ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरी बाबतचे आदेश या विभागाचे शासनाचे अवर सचिव दीपक केंद्रे यांनी राज्यपालांच्या डिजिटल स्वाक्षरीने काढले आहेत. या मंजुरीबद्दल माजी आमदार राजन पाटील, आ. यशवंत माने, बाळराजे पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानत या परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा हा प्रश्न पोटतिडकीने सोडवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मोहोळचे आ. यशवंत माने यांच्यासमवेत मुंबईमध्ये यापूर्वी वेळोवेळी झालेल्या भेटीमध्ये मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महोदय आणि विशेष करून राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे अनगर येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळण्या बाबतची मागणी सातत्याने केली होती. आ.यशवंत माने यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला या मंजुरीच्या आदेशाच्या स्वरूपात यश मिळाले आहे. - बाळराजे पाटील (चेअरमन लोकनेते शुगर)
0 Comments