श्याम पाटील, कु.शा.वाडीकर....तुम्ही थांबायला हवं होतं.......- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद
सकाळचे चार वाजत आले होते. मी गाढ झोपेत होतो आणि अचानक फोन खणखणला. पाहतो तर स्क्रीनवर संकेत पाटील, नांदेड यांचे नाव दिसले. एवढ्या पहाटे फोन केलेला पाहून मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली. फोन उचलला तसे संकेत पाटील म्हणाले, "डॉक्टर साहेब, अर्जंट बीड मधील कार्यकर्त्यांचे नंबर पाठवा." मी म्हटलं," काय झालं?" तेव्हा ते म्हणाले की गेवराई जवळ नांदेडकडे येताना शाम पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला आहे." मला वाटलं गाडीचे नुकसान झाला असेल, श्याम पाटील आणि आत मध्ये बसलेले कुणी सहकारी जखमी झाले असतील. तसा मी म्हणालो, " जास्त लागले नाही ना?" त्यावर संकेत पाटील म्हणाले, " श्याम पाटील जागीच ठार झाले आहेत अशी बातमी पोलिसांकडून मिळालेली आहे." ......... आणि........ आणि माझी झोपच उडाली. माझे सर्वांग थरथरायला लागले. कार्यकर्त्यांचे नंबर सुद्धा शोधता येईनात. सर्वांगाचा नुसता थरकाप सुटला होता. तशाही अवस्थेत मी बीड जिल्हाध्यक्ष विजय दराडे, प्रवीण ठोंबरे, विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स संकेत पाटील यांना पाठवले.
....... आणि आपण जे ऐकलं ते खरं ठरू नये असं मनोमन वाटू लागलं. छे छे ...... मृत्यू नसेल झाला पण प्रकृती गंभीर असेल..... जागीच ठार होण्या एवढं काही झालं नसेल असही वाटू लागलं..... श्याम पाटील म्हणजे रात्री अपरात्री फिरणारा माणूस, गाडी सांभाळून चालवणारा माणूस त्यांच्याकडून असं होणार नाही असं एक मन म्हणत होतं..... मी नंबर पाठवल्यानंतर संकेत पाटलांनी संबंधित कार्यकर्त्यांना फोन केले. झालेल्या प्रकाराची कल्पना दिली. स्थानिक कार्यकर्त्यांनी गेवराई कडे धाव घेतली. मी अर्धा तास वाट बघितली आणि त्याच्यानंतर परत संकेत पाटील यांना फोन लावला. पण त्यांनी श्याम पाटील गेल्याचीच बातमी दिली. तरीही माझे मन मानत नव्हते. म्हणून राहुल वाईकर यांना फोन केला. तेव्हा बातमी शंभर टक्के खरी आहे असे त्यांनी कळवले. होती श्याम पाटील कु. शा. वाडीकर हे आता या जगात नाहीत या कल्पनेनेच मी गळून गेलो. संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून सोबत असणारा कार्यकर्ता... ते मित्र... सर्व आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या.
गेल्याच महिन्यात शिवजयंतीला श्याम पाटील यांनी त्यांच्या गावामध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित केलं होतं. त्या अगोदर हसनाळ, ता. मुखेड येथेही आम्ही सोबत होतो. त्यांच्या गावी गेल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आणि डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाकडे निघालो. सोबत नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापुरकर हे होते. श्याम पाटलांनी आ. अंतापूरकर साहेब यांना अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्या विषयी विनंती केली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सुद्धा त्यांनी आपल्या या मागणीचा आणि इतर मागण्यांचा पुनरुच्चार केला. आमदार साहेबांनी त्यांच्या मागण्या मान्य सुद्धा केल्या. थोडक्यात काय तर श्याम पाटील हे चळवळीमधून घडलेलं नेतृत्व होतं. श्याम पाटील आणि संभाजी ब्रिगेड हे एक अतूट नातं होतं. हे नातं एवढं अतूट होतं की ज्या वेळेस शाम पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा त्यांच्या छातीवर संभाजी ब्रिगेडचा बिल्ला अत्यंत अभिमानाने विराजमान होता...... इतकं संभाजी ब्रिगेड आणि त्यांचं नातं घनिष्ठ झालेलं होतं.
संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासूनच ते या चळवळीमध्ये कार्यरत आणि सक्रिय झाले होते. मराठा आरक्षणाची लढाई असो की जिजाऊ- शिवराय बदनामीचे प्रकरण असो, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अडचणी असोत, चळवळी मध्ये एखाद्या कार्यकर्त्याला मनुवादी लोकांकडून धमकी देण्याचा प्रकार असो श्याम पाटील प्रत्येक प्रकरणात खंबीरपणे लढायचे. त्यांचं गाव खरं तर महाराष्ट्राच्या एका टोकाला आणि सीमेवर आहे. परंतु आपल्या कार्यकर्तृत्वाने श्याम पाटील यांनी गावाचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवले होते. त्यांना त्यांच्या गावाचा एवढा अभिमान होता की त्यांच्या नावाचा उच्चार कधीही श्याम पाटील असा झालेला मी ऐकला नाही. श्याम पाटील म्हटलं की पुढे आपोआप कु. शा. वाडीकर हे नाव निघायचे. शिवधर्म स्थापनेनंतर ज्या ज्या शिवधर्म परिषदा झाल्या त्यातली एक परिषद कु. शा. वाडीमध्ये घेण्याचं धाडस हे शाम पाटील यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केलं होतं. यावरूनच त्यांचा वैचारिक आणि लढवय्या बाणा लक्षात यायला हरकत नाही.
कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार असोत की कुणी मंत्री असो त्यांची हुजरेगिरी मुजरेगिरी करणे श्याम पाटलांना कधीही जमले नाही. उलट ते त्यांच्या रोखठोक शैलीमुळे प्रसिद्ध होते. कित्येकदा सर्वांसमक्ष स्टेजवर त्यांनी आमदार खासदार यांच्या तोंडावर आपण समाजासाठी काय करत आहात? आणि आरक्षणासारख्या लढाईमध्ये आपलं कितपत योगदान आहे? असे खडसावून विचारलेले मी स्वतः ऐकले आहे.
कु.शा. वाडी सारख्या लहान गावात त्यांनी परिवर्तनवादी विचार इतके खोलवर रुजवले होते की त्यांच्या गावांमध्ये जो विचार मंच उभा करण्यात आला त्या विचार मंचाला सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याची हिम्मत त्या काळात गावकऱ्यांनी आणि शाम पाटील यांनी दाखवली. अशा पद्धतीने त्यांचे कार्य आणि विजयी घोडदौड चालू असतानाच हा जो काही आजचा प्रकार घडला तो मराठा सेवा संघाच्या, संभाजी ब्रिगेडच्या चळवळीला, त्यांच्या मित्र परिवाराला आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का देणारा ठरला.
खरंतर कार्यकर्ता घडणं ही एक खूप मोठी प्रक्रिया असते आणि मोठ्या प्रक्रियेनंतर श्याम पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते तन, मन आणि विचाराने सुद्धा घडत असतात. आणि अशाप्रकारे सर्व अंगाने परिपक्व झालेला कार्यकर्ता असा अचानक आपल्या सर्वातून निघून जाणे हे कोणत्याही चळवळीची, समाजाची अपरिमित हानी करणारं ठरतं.
या शिवजयंतीला हसनाळ आणि कु. शा. वाडी येथे त्यांनी मला आवर्जून बोलावले होते. वैचारिक चर्चेसोबतच बऱ्याच गप्पा टप्पा विनोद नेहेमीच चालायचे. परंतु ही भेट आमची शेवटची भेट ठरेल असे मात्र स्वप्नातही वाटलं नव्हतं...... डुलकी लागल्यामुळे ड्रायव्हरने थांबण्यास सांगितले होते. परंतु पुढे वेळेवर जायचे असल्यामुळे श्याम पाटील यांनी गाडीचे सारथ्य स्वतःकडे घेतलं आणि..... तेवढ्यात घात झाला..... श्याम पाटील कुणाचीही वाट न पाहता पुढील प्रवासाला निघून गेले.....
श्याम पाटील थोडं थांबायला हवं होतं हो....😥
@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
(प्रदेश संघटक : संभाजी ब्रिगेड)
मो. ९४२२५२८२९०
0 Comments