++ भावपूर्ण शिवांजली अर्पण करताना ----- ++
संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर यांच्या अपघाती निधनाची दुःखद बातमी समजली . त्यांना भावपूर्ण शिवांजली अर्पण .. श्याम पाटील एक अत्यंत शिस्तबद्ध तरुण होता . सकाळी सौरभ कडून दुःखद बातमी समजली . धक्का बसला . नोव्हेंबर २०२१ मध्ये आम्ही नांदेड येथे भेटलो होतो . सर्वांनाच सावरण्यासाठी बळ देवो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना ..
मित्रांनो , गेवराई जवळ आजच सकाळी तीन वाजता दरम्यान कार चालवताना अपघातात मृत्यू झाला आहे असे समजले . मित्रांनो , गेल्या कित्येक वर्षांपासून मी जाहिरपणे सर्वांनाच विनंती केली आहे की कृपया रात्री उशिरा कारने प्रवास करु नका . स्वत: कार चालवू नका . कार चालवण्यासाठी चालक असला तरी रात्री उशिरापर्यंत प्रवास करू नका . चालक व प्रवासी सर्वच माणसे असतात . आपल्या खूप मर्यादा असतात ... त्यांचे भान राहत नाही . आणि शेवटी आम्ही टाळता येईल अशा अपघातात मृत्युमुखी पडतो . घरदार , कुटुंबीय , नातेवाईक मित्रमंडळी समाज सर्व दुःखात बुडतात . शौकाचा अंत शोकात होतो ... अशा प्रकारे आम्ही खूप सहकारी गमावले आहेत . हाच दुर्दैवी संदेश स्मृतीशेष श्याम पाटील कुशावाडीकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर लक्षात घेणे गरजेचे आहे .
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कृपया गंभीरपणे खालील सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे .....
(१) अगदीच अपवादात्मक स्थितीत अत्यावश्यक असल्याशिवाय स्वत: मालकीची चार चाकी गाडी विकत घेऊ नये . इत:पर घेतलीच तर एक पूर्णवेळ उत्तम चालक ठेवावा . तसेच चालकांना कुटुंबातील सदस्य म्हणून वागवावे . तहान भूक जेवण झोप आराम सुखदुःख चालकांना सुध्दा असते याची जाणीव ठेवणे . चालक खुष तर प्रवासात सुख व सुरक्षा हे सूत्र आहे .
(२) अगदीच आवश्यक असेल तरच स्वत:च्या खाजगी कारने जास्तीत जास्त ऐंशी किलोमीटर स्पिडने प्रवास करावा . गाडी पळवणे म्हणजे गाडी चालवणे नसते . अनोळखी परिसरात रात्री आठच्या सुमारास प्रवास थांबवावा . मुक्काम करावा . वेळ व पैसे वाचवण्यासाठी किंवा लवकर पोचण्यासाठी अनेकदा रात्रभर जागून प्रवास केला जातो .. आणि दुर्घटना घडतात .
(३) खाजगी मालकीची कार न घेता भाड्याची कार वापरावी . तरीही रात्री अपरात्री उशिरा प्रवास करु नये . चालकांना सूचना देऊ नये . दिवसभर प्रवास न करता तीन तीन तास अंतरावर थोडासा बदल करून ब्रेक घेतला पाहिजेत . घर सोडताना अगोदरच रस्त्यावरील ओळखीच्या मराठा सेवा संघ वा अन्य मित्रांना माहिती दिली पाहिजे . भेटीगाठी घेत प्रवास केला पाहिजे .
(४) गाडी चालविणे हे एक विशिष्ट स्किल आहे . आम्हाला अगदीच गरज असेल तेव्हाच इमर्जन्सीत जवळपास गाडी चालवायला हरकत नाही . शिक्षक , प्राध्यापक , डॉक्टर , इंजिनिअर यांचे जसे खास कौशल्य असते , तसेच चालकांचे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे .
(६) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजे बसेस , रेल्वे , विमान , जहाज इत्यादी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे .
(७) दोन चाकी वाहने सुध्दा खूप काळजीपूर्वक चालवले पाहिजे . हेल्मेट वापरावे .
(८) आपल्याला वाहतूक नियमांची माहिती पाहिजे . रस्त्यावरील चिन्हे समजली पाहिजे . रस्ते आपल्या एकट्याच्या मालकीचे नसतात . आपली चूक नसतानाही अपघात घडतात . पण आम्ही प्रत्येकाने जर समजूतदारपणा दाखवला तर टाळता येणारे अपघात टाळले जाऊ शकतात हे नक्कीच .
(९) कुटुंबातील सर्व सदस्यांनी ह्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे . अनेकदा कुटुंबातील पुरूष सदस्य रात्री उशिरा प्रवासाला निघतात . अशा वेळी कुटुंबातील सर्व महिलांनी व मुलांनी त्यांना थांबवले पाहिजे . चार चाकी गाडी खाजगी मालकीची असो की भाड्याची कोणत्याही परिस्थितीत रात्री उशिरापर्यंत प्रवास करु नये .
++ मित्रांनो , यापूर्वी अनेकदा मी सोशल मीडिया ग्रुपवर तसेच मासिक मराठामार्ग मधून याप्रमाणे आपणास विनंती केली आहे . मी मराठा सेवा संघाचे काम करताना सगळीकडेच बसने प्रवास केला आहे. कधीही वेळ चूकली नाही . गेल्या पाच वर्षांपासून खाजगी कारने फिरत असतो . पण रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करतो . सरकारी अधिकारी असतांनाही मी हेच सूत्र पाळले होते . दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे किंवा विमान प्रवास केला जातो ...
स्मृतीशेष श्याम पाटील कुशावाडीकर ह्यांना शिवांजली अर्पण करताना आम्ही सर्वांनी हीच महत्वाची शपथ घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे ...
श्याम पाटील कुशावाडीकर यांना मराठा सेवा संघ व तेहतीस कक्ष तसेच आमच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण शिवांजली अर्पण करून आपण त्यांच्या कुटुंबीयांना सांभाळून घेतले पाहिजे अशी अपेक्षा आहे ...
पुरुषोत्तम व रेखाताई खेडेकर चिखली ..
दिनांक ३१ मार्च २०२२ .
0 Comments