आषाढीवारीत सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 8, 2022

आषाढीवारीत सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

आषाढीवारीत सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, (कटूसत्य वृत्त);- गेल्या दोन वर्षात कोरोना  संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने आषाढी वारी वारकरी संप्रदायाच्या प्रथा-परंपराचे जतन करून मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर स्वप्नील रावडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, यंदाची आषाढी वारी १० जुलै २०२२ रोजी भरणार असून आषाढी यात्रा कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुमारे दहा ते बारा लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून आवश्यक मूलभूत सोयी सुविधा तसेच सुरक्षा दिली जाते. राष्ट्रीय महामार्ग कामांमुळे पालखी तळ, पालखी विसावा जागा अपुऱ्या पडत असतील तर जागेची तत्काळ पर्यायी व्यवस्था करून वारकरी भाविकांना जागेबाबत अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यात्रा कालावधीत व वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाला दिलेली जबाबदारी पार पाडावी. यासाठी जिल्हा परिषद विभागाने पालखी मार्गावर व पालखीतळावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  व तात्पुरते शौचालय, पालखी मार्ग व पालखी तळावरील अतिक्रमणे काढणे. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी, काटेरी झाडेझुडपे काढावीत. पालखी तळावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आषाढी वारी पावसाळ्यात येत असल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता मुबलक प्रमाणात औषधाचा साठा तयार ठेवावा, तज्ञ डॉक्टरांसह फिरते आरोग्य पथक उपलब्ध ठेवावे, पालखी मार्ग व पालखी तळावरील पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. पंढरपूर नगरपालिकेने शहरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी व भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तात्पुरते शौचालय व्यवस्था स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. शहरातील अतिक्रमणे काढावीत. पोलीस प्रशासन आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचेबरोबरच वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन नियोजन करावे. महावितरण विभागाने पालखी मार्ग व पालखी तळाच्या ठिकाणी अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा करावा. आवश्यक ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचना श्री शंभरकर यांनी दिल्या.

श्री गुरव यांनी मंदिर समिती तसेच तालुका प्रशासनाकडून आषाढी वारी कालावधीत करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages