डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची काँग्रेसचे नेते अजयसिंह इंगवले यांची मागणी

डाळिंबाच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांसोबत बैठकीचे ना. बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- डाळिंब बागांवर तेल्या, मर व पिन होल बोरर यामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी व त्यांच्यावर आधारित असणाऱ्या सर्व व्यापारी वर्गांवर खूप मोठे संकट ओढवणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असून सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या प्रश्नी लवकरच कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. सांगोल्यातील काँग्रेसचे नेते अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, युवकनेते अजयसिंह इंगवले, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार, युवक विधानसभा अध्यक्ष अजित चव्हाण, विजयसिंह इंगवले-पाटील यांनी ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी अजयसिंह इंगवले यांनी सांगोला तालुक्यातील उध्वस्त डाळिंब बागांची माहिती दिली. राज्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुका हा डाळिंबासाठी देशभर प्रसिद्ध होता. सांगोल्याचे डाळिंबे थेट सातासमुद्रापार असलेल्या युरोपच्या बाजारात भाव खात असते. डाळिंबामुळे सांगोल्यातील शेतकऱ्याला समृद्धी तर आलीच शिवाय एकमेकांच्या स्पर्धेमुळे तालुक्याचे उत्पन्नही कितीतरी पटीत वाढत होते. नैसर्गिक संकटामुळे कधी तेल्या, कधी मर, कधी कुजवं आणि आता नव्याने आलेला पिन होल बोअर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत.
सातत्याने होत असलेला मोठा आर्थिक तोटा आणि नवनवीन रोगामुळे अडचणीत येऊ लागलेल्या बागा याला वैतागून आता सांगोल्यातील शेतकरी डाळिंबाच्या उभ्या बागात ट्रॅक्टर घालून बागा उखडून टाकू लागला आहे. निम्म्यापेक्षा जास्त बागा या खोडकिडीमुळे जाळून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबासारखे नगदी पिकाकडे पाठ फिरवली आहे. सध्या सांगोला तालुक्यातील केवळ २५ टक्के बागा उरल्या असून यावरही तेल्या सारखे रोग आल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट बागांवर ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात केला आहे. डाळिंब बागा जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावर ना.बाळासाहेब थोरात यांनी लवकरच यासंदर्भात उपायोजना करण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक लावण्यासंदर्भात निर्देश दिले.
0 Comments