Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ६ एप्रिल ते १६ एप्रिल २०२२ दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने गुरूवार दि. ७ एप्रिल २०२२ रोजी महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार यावर वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या, याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संगमेश्वर महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रत्येक ठिकाणी १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य धानप्पा मैत्री, प्राध्यापक संघप्रकाश दोड्डी आदी उपस्थित होते.  मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला.

भारती विद्यापीठाच्या समाजकार्य महाविद्यालयात आज वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी श्री. आढे यांच्यासह जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी सचिन कवले, समाजकार्य महाविद्यालयाच्या संचालिका जयश्री मेहता उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून आशुतोष नाटकर, प्रफुल्ल कुमार सोनवणे यांनी तर निबंध स्पर्धेसाठी प्रा.डॉ. तुपेरे, प्रा शेलगे यांनी कामकाज पाहिले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजना आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याबाबतची माहिती दिली जाणार आहे. शिवाय लघुनाटिकेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  आढे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments