Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस, राष्ट्रवादीकडून केक कापून 'एप्रिल फूल डे' साजरा-महेबूब शेख

मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस, राष्ट्रवादीकडून केक कापून 'एप्रिल फूल डे' साजरा -महेबूब शेख 


मुंबई (कटूसत्य वृत्त):- एप्रिल फूलच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरून त्यांच्या खोट्या आश्वासानाचा पाढाच वाचला. राऊत यांचा हा हल्लाबोल कमी होता की काय आता राष्ट्रवादीनेही खोट्या आश्वासनाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं आहे. सतत वाढणारी महागाई… इंधन दरवाढ… वाढती बेरोजगारी… अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आणि प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्त्वाखाली 'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.आजचा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून ओळखला जातो. एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे. केंद्रसरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याच मुंबईतील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला. यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, मोहसीन शेख, वीरू वाघमारे, गौतम आगा, सुनील पालवे, नाजीर शेख तसेच अन्य युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

                                                       

राऊतांची टीका काय?

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनाही आज सकाळी मोदी सरकारवर टीका केली होती. या देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. सरकारने एप्रिल फूल करून टाकलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत वर्षानुवर्ष एप्रिल फूल सुरू आहे. आता एप्रिल फूल हा गंमतीचा विषय राहिला नाही, एप्रिल फूल हा जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकारमध्ये झाला आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थापा मारणं बंद करा

प्रत्येक सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे आणि थापा मारणं बंद केलं पाहिजे. फसवाफसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न फार गंभीर होत चालले आहेत. गंमत तेवढ्या पुरती ठिक असते. आता अच्छे दिन येणार हे सुद्धा एप्रिल फूलच आहे. तुमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. लोक वाट बघत आहेत. सात वर्ष एप्रिल फूलच सुरू आहे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फूलच आहे. पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात येणार हे सुद्धा एप्रिल फूलच आहे. महाराष्ट्रात किंवा देशात सूडाचं राजकारण करत नाही हे सांगणं हे एप्रिल फूलच आहे. अशी अनेक एप्रिल फूलची मालिका गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. तरीही महाराष्ट्र पुढे चालला आहे, असंही राऊत म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments