सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त मार्जिन मनीबाबत कार्यशाळा

.jpeg)
सोलापूर,दि.12 (जिमाका) : अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. त्यांचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज मंगळवार दि.12 एप्रिल 2022 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे मार्जिन मनी योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.उपआयुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य छाया गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. कार्यशाळेत उद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य सचिव सचिन कवले, जिल्हा अग्रणी बँकेचे अमोल सांगले, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक विश्वास वेताळ, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अनिलकुमार साळुंखे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे जिल्हा समन्वयक सिध्दराम चाबुकस्वार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य एम.एस.उडानशिवे यांनी उद्योजकांना तसेच विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना, मार्जिन मनी योजना, उद्योजकता व उद्योजकता विकास आदींबाबत मार्गदर्शन केले.कार्यशाळेला बार्टीचे समतादूत, उद्योजक, शासकीय वसतिगृहांचे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, लाभार्थी, स्वयंसहाय्यता युवा गट सदस्य तसेच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले. आभार विशेष अधिकारी श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन बार्टीचे तालुका समन्वयक उमेश पुजारी यांनी केले.
0 Comments