प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा करा
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून चांगले काम करीत आहे. सर्व विभागांनी 31 मार्च 2022 पर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करावीत. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या.जिल्हा परिषदेमध्ये 1 एप्रिल 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 अखेर अहवाल वाचन आणि तपासणी बैठकीत श्री. राव बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त राहुल साकोरे, उपायुक्त (विकास) विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सहायक आयुक्त (तपासणी) संतोष हराळे, सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. राव यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने आपल्याकडील कामांचा नियमित आढावा घ्यावा. अनेक वर्षे प्रलंबित कामे, विषय प्राधान्याने मार्गी लावावी. कामे करताना जिल्हा परिषद कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक कामाला वेळेचे बंधन ठेवून करावीत, म्हणजे कामांचा निपटारा होईल. जात पडताळणी, स्थायित्व लाभ, बिंदु नामावली या बाबी त्वरित करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.प्रारंभी स्वामी यांनी जिल्हा परिषद राबवित असलेल्या विविध अभियानांची माहिती दिली. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व 14 हजार कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ऑनलाईन केली. माझं गाव-कोरोनामुक्त गाव आणि माझे मूल-माझी जबाबदारी अभियान राबवून अनेक गावे कोरोनामुक्त केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून लहान मुलांच्या बाबतीत काळजी घेण्यात आली. 10 लाख बालकांची आरोग्य तपासणी करून आरोग्य पत्रिका तयार केली आहे. गंभीर आजारी बालकांवर राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाद्वारे (आरबीएसके) उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आल्या. माझी वसुंधरा अभियानात प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक झाड लावण्यास सांगितले होते, त्यानुसार 18 हाजर झाडे लावली. 706 गावात एकाचवेळी बैठका घेऊन माझी वसुंधरेचे प्रबोधन केले. तसेच बालसंजीवनी उपक्रमातून बालमृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली असून ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याची माहिती त्यांनी दिली.
0 Comments