Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यात महावितरण आणि शेतकरी संघर्ष आणखी पेटला

 मोहोळ तालुक्यात महावितरण आणि शेतकरी संघर्ष आणखी पेटला




स्थानिक कर्मचाऱ्यांचे राजकीय डावपेच.. आणि शेतकरी ग्राहकांमध्ये सुप्त गटबाजी


मोहोळ (साहिल शेख):-मोहोळ तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सतीच्या वीजबिल वसुलीसाठी अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर सोडवले जात आहेत. सध्या उन्हाचा वाढता कडाका त्यात  हातातोंडाशी आलेल्या फळबागा आणि करपू लागलेली पिके  यामुळे कष्टकरी बळिराजा आणखी हतबल झाला आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि काही दिवस शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी अनेक पक्ष संघटनांनी मोर्चा काढत महावितरण प्रशासनाच्या राज्यातील भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर  जनहित शेतकरी संघटना यांनी मोहोळ महावितरण प्रशासनावर मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. मोहोळ तालुका हा दोन नद्या आणि कालव्याच्या सिंचन स्त्रोतावर अवलंबून असणारा तालुका आहे. मोहोळ तालुक्यात गत दहा वर्षात द्राक्षबागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सहाजिकच त्यामुळे ठिबक सिंचन आणि इतर तत्सम सिंचन सुविधांसाठी विजेची उपलब्धता असणे आवश्यक आहे. सध्या द्राक्षबागा आणि डाळिंब,केळी आणि इतर फळभाज्या अत्यंत मोक्याच्या अवस्थेत आहेत. शिवाय दोन महिन्यापूर्वी शेतकरी बांधवांनी महावितरणला प्रति कनेक्शन पाच हजार रुपये रक्कम भरली आहे. गेल्या दोन वर्षापासून लोकडाऊन आणि करोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या पीचलेला असताना त्यांच्यावर वारंवार आर्थिक संकट लादणे हे निश्चितपणे शेतकरी बांधवांना क्लेशदायक वाटत आहे. त्याचा उद्रेक मोहोळ तालुक्यात पहावयास मिळत आहे. मोहोळ तालुक्याच्या महावितरण प्रशासनात जवळपास बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी हे स्थानिक असल्यामुळे त्यांचे राजकीय घटकाशी असणारे लागेबांधे प्रशासन आणि सर्वसामान्य यामधील संघर्षाची दरी वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवता ठेवता नाकी नऊ येत आहे. जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनावेळी झालेल्या घटनेमुळे येत्या काळात महावितरण आणि शेतकरी असा वाढता संघर्ष पहावयास मिळाल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे याबाबत आता प्रशासकीय स्तरावर तोडगा काढून सर्वसामान्य ग्राहक आणि महावितरण प्रशासन यामध्ये उत्तम समन्वय आणि निकोप संवादाचे वातावरण कायम राहायला हवे.गत दहा वर्षापासून सर्वसामान्य जनता आणि मोहोळ तालुक्यातील विविध विभागाचे प्रशासन यामधील दरी वाढताना दिसत आहे. काल महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रकार संपूर्ण जिल्हाभरात चर्चेचा झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार बर्‍याचदा झाले.वरिष्ठ स्तरावरून येणारे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला कसेही भरडले तरी चालेल अशी भावना महावितरणच्या प्रशासनाची झाली आहे. त्यामुळेच तालुक्यात हा संघर्ष वाढला.
शिवाय सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये परिस्थिती आलबेल असताना मोहोळ तालुक्यात मात्र जास्त प्रमाणात वीज तोडणीचा अट्टहास होणे हे शेतकरी बांधवांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.


Reactions

Post a Comment

0 Comments