सरपंच लक्ष्मी चांदणे यांचा नुकसानग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
लऊळच्या मुलाणी कुटूंबाचा मोडलेला संसार उभा
लऊळ(कालिदास जानराव): येथील रहिवासी बंडू मुलाणी हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी पुणे येथे राहत होते. कोरोना काळात पुणे येथे राहून कुटुंबाचे पालन पोषण करणे जिकरीचे झाल्याने मुलाणी यांनी गड्या आपला गाव बरा म्हणत गाव गाठले.आपली पत्नी आणि तीन मुलासह गावानजीक असलेल्या शेतात पत्र्याचे शेड उभे करून मोलमजुरी करू लागले.सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास घरातील गॅसने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच भलामोठा आवाज झाला.मुलाणी यांचा कसाबसा उभा असलेला संसार उध्वस्त झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.परंतु घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले.गावातील मित्रमंडळी व ग्रामस्थ यांनी आपापल्या परीने पीडित कुटूंबास मदत केली. यामध्ये त्यांचे राहते घर तयार झाले.डोक्यावर छप्पर तर मिळालं पण संसाराचं काय हा यक्षप्रश्न मुलाणी कुटूंबासमोर होता.हा सर्व प्रकार सुरू असताना संबंधितांकडून ही बातमी सरावली(पालघर)गावच्या सरपंच लक्ष्मी चांदणे यांना समजली.पीडित व्यक्ती कोण कुठली याची विचारपूस न करता जे का रांजले गांजले त्यासी म्हणावे आपुले या उक्तीप्रमाणे पीडित कुटूंबास मदतीचा हात देण्यासाठी त्या पुढे सरसावल्या.संसारात उपयोगी पडणारी भांडी,कपडे,अन्नधान्य यासह इतर काही लागणारी मदत केली. चांदणे यांनी केलेल्या मदतीने मुलाणी कुटूंब अक्षरशः भारावून गेले.अचानक आलेल्या संकटांमुळे खचून गेलेलं कुटुंब आज केलेल्या मदतीने पुन्हा एकदा जोमाने संसाराचा गाडा हाकण्यासाठी सज्ज झाला आहे.
0 Comments