येत्या ५ एप्रिलला महाविकास आघाडीतून बाहेर पडणार राजू शेट्टी ?
मुंबई (कटूसत्य वृत्त):- आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण होत असतानाच २०२४ची हाक भाजपकडून देण्यात आली आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारला पाठिंबा देणारा एक घटकपक्ष असलेल्या राजू शेटींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. राजू शेट्टींनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी धोरण स्पष्ट केले आहे.२०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करताना राज्य सरकारने सूचक म्हणून राजू शेट्टींचे नाव घेतले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.राजू शेट्टी राज्य सरकारच्या धोरणामधील अनेक मुद्दे खटकणारे असल्याचे म्हणाले आहेत. स्वाभिमानी ही शेतकरी, शेतमजुरांमध्ये काम करणारी संघटना आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षातील धोरणाचे परिक्षण करायचे आहे. अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटले गेले. पण एखादे नवीन धोरण राबवत असताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधण्यात आला नसल्याचे म्हणत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली.आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण महाविकास आघाडीचा नेता निवडताना सूचक म्हणून माझे नाव त्यांना का घ्यावेसे वाटले? कारण स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जे नैतिक अधिष्ठान टिकवले आहे, ते त्यांना सरकारसोबत हवे होते. पण आज धोरणात्मक निर्णय घेताना तुम्ही आम्हाला बेदखल करत असाल, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असेल आणि समोरून लोक म्हणत असतील की तुमचे सरकार असून तुम्हाला रस्त्यावर उतरावे का लागत आहे? तर यावर आम्हाला चर्चा करणे आवश्यक वाटते, असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत राजू शेट्टींनी सूचक इशारा दिला आहे.
0 Comments