भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वस्तरातून हवे प्रयत्न- न्यायाधीश एम.एन पाटील
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळ अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माळशिरस तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी केले आहे. माळशिरस जिल्हा न्यायालयात मंगळवारी जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
न्यायाधीश एम. एन. पाटील पाण्याच्या समस्येविषयी बोलताना म्हणाले, "आज जगात पाण्याचे संकट चालू आहे. असा एकही प्रदेश नाही जेथे पाण्याची आवश्यकता नाही. आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल, असं अापण कित्येकदा ऐकलं असेल. मानव पाण्याचे महत्त्व विसरत आहे, ज्यामुळे आज पाण्याचे संकट सर्वांसमोर आहे. वेळीच पाण्याचं महत्त्व जाणल्यास भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही."
यावेळी न्यायाधीश जी. एम. नदाफ यांनी भूजलपातळी संदर्भात बोलताना म्हणाले की, दैनंदिन वापराची गरज भागविण्यासाठी भूजल साठ्याचा वापर कूपनलिकांच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु, काँक्रिटीकरण, डांबरीकरणासह अन्य कारणांमुळे पावसाळी पाण्याचा भूगर्भात निचरा होत नसल्याची स्थिती आहे. पण, उपसा मात्र सातत्याने होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. भूजलपातळीत वर्षानुवर्षे होणारी घटही चिंता वाढविणारी ठरत आहे. दर वर्षी तीन ते चार फुटांपर्यंत ही पातळी खालावत चालली असल्याने वेळीच उपाययोजनांसह जनजागृती करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. भूजल पातळीचा स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक पावसाळी पाण्याचा भूगर्भात निचरा होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याकरिता मोकळ्या भूखंडांवर वृक्ष लागवड करून पावसाचे पाणी वाहून न जाता झिरपेल, अशी व्यवस्था केली पाहिजे. गरजेइतकाच पाण्याचा उपसा कूपनलिकांतून केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी न्या. व्ही. ए. कारंडे यांनी यांनी पाणी बचत बाबतचे महत्व विषद केले तसेच सुक्ष्म सिंचन पध्दतीचे फायदे, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी न्या. क्षीरसागर, पी.पी. कुलकर्णी, सहाय्यक अधीक्षक फारुख शेख, सरकारी वकील एस. ए. ढवळे, बार संघाचे सदस्य तसेच पक्षकार उपस्थित होते. सहाय्यक अधीक्षक प्रकाश साखरे यांनी सूत्रसंचालन केले तर अाभार मुक्तेश्वर भाले यांनी मानले.

0 Comments