Hot Posts

6/recent/ticker-posts

धुलिवंदन आणि तुकाराम बीज यांचा नेमका संबंध काय?- डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद

धुलिवंदन आणि तुकाराम बीज यांचा नेमका संबंध काय? - डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद


दरवर्षी धुलिवंदनच्या दुसऱ्याच दिवशी तुकाराम बीज येते. बऱ्याच लोकांना तुकाराम बीज म्हणजे नक्की काय? हेच माहित नसते किंवा बीज या शब्दाचा नेमका अर्थ काय व तो तु कोबांशी कसा जोडला गेला हेही कळत नाही. तशा प्रकारच्या विचारणा मला दरवर्षी होत असतात. काही लोक तर तुकाराम बीजेच्या शुभेच्छाही देत असतात. तेव्हा तुकाराम बीज याविषयी लोकांचा समज - गैरसमज दूर करावा, बीज या शब्दाबद्दल थोडीशी माहिती द्यावी आणि नेहमी धुलिवंदन झाले की बीज का येते याची माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच करत आहे.

तुकाराम बिजेचा आपल्याला जर नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल आणि त्याचा धुलिवंदनाशी संबंध कसा आला हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आधी आपल्याला हिंदू कालगणना माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षात एकूण बारा महिने असतात. त्या बारा महिन्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत - चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशिष, पौष, माघ आणि फाल्गुन. साधारणतः चैत्र प्रतिपदेला (म्हणजे पंधरवाड्यातील पाहिला दिवस / प्रथमा)  हिंदूंचे नववर्ष असते त्यालाच गुढी पाडवा असेही म्हटले जाते. तर फाल्गुन महिना हा हिंदू वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यातील होळी व धुलिवंदन हे शेवटचे सण असतात. आता या बारा महिन्यातील प्रत्येक महिन्यात तीस दिवस असतात. हे तीस दिवस पंधरा पंधरा दिवसांच्या दोन पक्षात / भागात विभागले जातात. पंधरा दिवसांच्या या कालखंडाला पंधरवाडा सुद्धा म्हणतात. पंधरा दिवसांच्या एका पक्षाला शुद्ध / शुक्ल पक्ष असे म्हटले जाते तर दुसऱ्या पक्षाला कृष्ण / वद्य पक्ष असे म्हटले जाते. 

आता या दोनही पक्षात साधारणतः पंधरा पंधरा तिथी असतात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्रथमा किंवा प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी व पौर्णिमा किंवा अमवास्या. दोनही पंधरवड्यातील चौदा तिथी एकाच नावाने ओळखल्या जातात फरक असतो तो केवळ पंधराव्या दिवसाचा ज्याला शुद्ध पक्षात पौर्णिमा म्हटले जाते तर कृष्ण पक्षात अमावस्या म्हटले जाते. शुद्ध पक्षात प्रतिपदेला असणारी चंद्राची कोर वाढत वाढत जाऊन पौर्णिमेला संपूर्ण चंद्रबिंब बनते तर कृष्ण पक्षात चंद्र हळूहळू कमी होत होत पंधराव्या दिवशी संपूर्ण काळा ठिक्कर पडतो म्हणजेच त्या दिवशी अमावस्या होते. छ. शिवरायांच्या राजमुद्रेतसुद्धा प्रतिपदेचा उल्लेख आहे. अर्थात ती प्रतिपदा ही शुद्ध किंवा शुक्लपक्षातील आहे. कारण या पक्षातच प्रतिपदेपासून चंद्रकोर कलेकलेने वाढत जाते आणि पौर्णिमेला संपूर्ण चंद्र दिसतो. म्हणजे या चंद्रकोरीप्रमाणे शिवरायांचे राज्य सुद्धा सतत वृद्धिंगत होत राहो असा त्या राजमुद्रेचा अर्थ आहे. थोडक्यात काय तर प्रतिपदा ते पोर्णिमा म्हणजे शुद्ध / शुक्ल पक्ष आहे तर प्रतिपदा ते अमावस्या म्हणजे कृष्ण / वद्य पक्ष होय. 

बीज म्हणजे काय? :

प्रत्येक पंधरवाड्यातील दुसऱ्या दिवसाला द्वितीया असे म्हटले जात असल्याचे आपण यापूर्वीच पाहिले आहे. तर या द्वितीयेलाच 'बीज' असे म्हटले जाते. याचा अर्थ बीज हा द्वितीया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बीज म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून दुसरा दिवस असा त्याचा अर्थ आहे. प्रथमा किंवा प्रतिपदेनंतर येणारा दिवस म्हणजे बीज. तुकाराम बीज या शब्दातील बीज शब्द म्हणजे दुसरा दिवस, प्रथमे नंतर येणारा दिवस एवढाच त्याचा अर्थ आहे. बलीप्रतिपदेनंतर कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण असल्याचे आपणास ठाऊकच असेल. ज्या दिवशी धुलिवंदन असते त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुकाराम बीज असते. पण बीज हा शब्द तुकोबाशी कसा जोडल्या गेला हे पाहणे आता महत्वाचे आहे. 

तुकोबा आणि धुलिवंदन :

महाराष्ट्रात तुकोबांच्या अंत:कालाविषयी दोन प्रवाद आहेत. पारंपरिक वर्ग मोठ्या हिरीरीने तुकोबांना न्यायला गरुड व  विमान आले आणि तुकोबा त्यावर बसून वैकुंठाला गेल्याचे सांगत असतो. तर चिकित्सक वृत्तीचे लोक मात्र तुकोबांचे काहीतरी बरेवाईट झाल्याचे सप्रमाण सांगत असतात. अर्थात प्रस्तुत लेखाचा विषय हा तुकोबांचा शेवट कसा झाला? ते वैकुंठाला गेले की त्यांचा घातपात झाला? हा नसल्यामुळे त्या चर्चेत आपल्याला जायचे नाही. तुकोबांच्या अंत:काळाविषयीचे महाराष्ट्रात दोन प्रवाद जरी प्रचलित असले तरी त्यांचा शेवट हा शिमगा आणि धुलिवंदन याच काळात झाला याबद्दल मात्र सर्वांचे एकमत आहे. म्हणजे वैकुंठाला गेले तरी ते शिमगा, धुळवड या काळात गेले किंवा त्यांचा घातपात झाला तरी तो याच काळात झाला असावा यावर सर्वांचे एकमत आहे. वाद आहे तो कसे गेले याचा. त्यामुळे तुकोबांच्या जाण्याचा आणि धुळवडीचा संबंध हा असा आहे. देहू येथील देहूकरांच्या पूजेतील अभंगाच्या वहीत स्पष्टपणे "सके १५७१ विरोधीना शंवछरे शीमगा वद्य द्वितीया : वार सोमवार. ते दिवसी : प्रातःकाळी तुकोबांनी तिर्थास प्रयाण केले : शुभं भवतु मंगळ" असा उल्लेख आहे. डॉ. आ. साळुंखे यांनी सुद्धा त्यांच्या जगप्रसिद्ध विद्रोही तुकाराम या ग्रंथात वि. का. राजवाडे यांचा पुढील संदर्भ दिलेला आहे. "शक १५७१ च्या फाल्गुन शुद्ध १२ नंतर चार दिवसांनी तो वारला. १२ नंतर चवथ्या दिवशी शनिवारी वद्य २ होती. शुक्रवारी पूर्णिमा असून वद्य प्रतिपदेचा क्षय होता." (विद्रोही तुकाराम, परिशिष्ट ५, तुकारामांचा मृत्यू आणि धुळवड) राजवाडेंच्या या विधानावर भाष्य करताना याच परिशिष्टात डॉ आ ह साळुंखे लिहितात, "याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. शके १५७१ मध्ये फाल्गुन वद्य द्वितीया ही होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी आलेली होती. तात्पर्य, धुळवड हाच तुकोबांच्या मृत्यूचा दिवस, याविषयी संशयाला जागाच राहत नाही.  पां. बा. कवडे यांनीसुद्धा तुकोबांचा मृत्यू धुळवडीच्या वातावरणात झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे सन १६४९ (शके १५७१) च्या फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला होळी होती. फाल्गुन पोर्णिमेनंतर शुद्ध पक्ष संपून कृष्ण / वद्य पक्ष सुरु होतो. फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड किंवा धुलिवंदन होते. या दिवशी तुकोबा 'गुप्त' झाले. तुकोबांनी म्हटलेच आहे, 'अंत:काळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ।।. पण धुळवडीच्या वातावरणात ही बाब कुणाच्या लक्षात आली नसावी. दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया (बीज) तुकोबा कालपासून दिसत नाहीत हे सर्वांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध झाली. पण तुकोबांचा कुठेही शोध लागला नाही. तुकोबा आता सापडणार नाहीत असे लक्षात आल्यावर त्यांची शोधाशोध थांबवण्यात आली. तेव्हा रामेश्वर भटाने सर्वांना विचारून निर्णय दिला, " म्हणजे रामेश्वर भट सकळा पुसोनी । गेला तो विमानी बैसोनिया ।।" हा निर्णय ज्या दिवशी झाला तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया. द्वितीया म्हणजे बीज हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. म्हणून त्या दिवसाला "तुकाराम बीज" असे म्हटले जाते आणि तुकाराम बीज ही नेहमी धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशीच येते. तुकाराम बीज साजरी करायची का? बिजेला एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या का? :

भावांनो आपण सर्वांनी तुकाराम बीज साजरी करायलाच हवी. त्यादिवशी तुकोबांच्या चरित्राची, त्यांच्या संघर्षाची, त्यांना जी जीवनमूल्य समाजात रुजवायची होती त्यांची आठवण करायलाच हवी. त्यांच्या अभंगांचे गायन, भजन व कीर्तन व्हायलाच हवे. तुकोबांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात आजन्म लढा दिला त्या व्यवस्थेच्या विरोधात आजही लढण्याची शपथ आपण घ्यायला हवी. तुकोबांना अभिप्रेत असणारी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण यादिवशी कुणीही एकमेकांना शुभेच्छा मात्र द्यायच्या नाहीत. कारण ज्यादिवशी तुकोबा देहूतून नाहीसे झाले त्यादिवशी त्यांच्या कुटुंबाची अत्यंत वाईट अवस्था झालेली होती. ही अवस्था एवढी करूण होती की तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबाराय यांनी आपल्या अभंगातून या अवस्थेचे केलेले वर्णन वाचले की कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाहीत. "आक्रंदिती बाळे करुणावचनी । त्या शोके मेदिनी फुटो पाहे ।। तुकोबांच्या तथाकथित वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबाराय यांनी लिहिलेल्या अभंगातील ही एक ओळ. या एकाच ओळीतून तुकोबांच्या बेपत्ता होण्यानन्तर त्यांच्या घरात किती कोलाहल माजला होता हे लक्षात येते. वरील ओळींचा स्पष्ट अर्थ आहे की तुकोबांच्या जाण्याने घरातील मंडळी लहान बाळे, स्त्रिया इत्यादी एवढे आक्रंदन करायला लागली, एवढे रडायला लागली, एवढा शोक व्यक्त करायला लागली की त्यांचे ते करूण रडणे ऐकून (मेदिनी म्हणजे पृथ्वी) जणू पृथ्वी सुद्धा दुभंगून जाईल.

मग ज्या घटनेने तुकोबांच्या कुटुंबियांना पृथ्वीला भेदणारे दुःख झाले त्या घटनेच्या आपण शुभेच्छा द्यायच्या का? हा दिवस आपण एखाद्या सणासारखा साजरा करायचा का? याचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे. तुकोबांच्या अचानक जाण्याने कान्होबांना पोरके झाल्यासारखे वाटत होते. ते म्हणतात, "कान्हा म्हणे तुझ्या वियोगे पोरटी । झालो दे रे भेटी बंधुराया ।" तुकोबा काहीही करून तुम्ही परत या, आम्हाला तुमचा वियोग सहन होत नाहीये असा आर्त टाहो कान्होबा सतत फोडत होते. एवढेच काय पण जर प्रत्यक्ष विठ्ठल मला भेटला आणि तो भक्ती, मुक्ती, ब्रह्मज्ञान, वैकुंठ द्यायला लागला तर मी ते सर्व नाकारेल आणि केवळ माझा भाऊ मला परत आणून दे असे विठ्ठलाला खडसावेल असे कान्होबानी एका अभंगात लिहिलेले आहे.

भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोनि भावा वेगी ।।

रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगी ।।

नको आपुलिया नेऊ वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणून वेगी ।।

नको होऊ काही होशील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगी ।।

तुकयाबंधू म्हणे पाहा हो नाहीतरी । हत्या येईल शिरी पांडुरंगा ।।

विठ्ठला तू आम्हाला प्रसन्न होऊ नको, तुझी रिद्धी, सिद्धी, मोक्ष, वैकुंठ सर्व काही गुंडाळून ठेव. पण काहीही करून माझा भाऊ मला परत दे अशी आर्त विनवणी कान्होबा सतत विठ्ठलाकडे करत होते. अहो एवढेच काय पण शेवटच्या चरणात त्यांनी विठ्ठलाला चक्क धमकी दिलेली आढळते. ते म्हणतात की माझ्या भावाला जर तू परत आणून दिले नाहीस तर त्याच्या हत्येचे पातक तुझ्या माथी लागेल. तुकोबांच्या निर्वाणावेळी त्यांची बायको जिजाई गरोदर होत्या. मग विचार करा तुकोबांच्या असे अचानक जाण्याने त्यांच्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळला असेल? त्यांची किती वाईट झालेली असेल? त्यांच्या लेकरांची, मुलींची अवस्था कशी असेल? त्यामुळे त्यादिवशी तुकोबा अचानक गायब झाले तो दिवस त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत दुःखाचा होता. एवढा की तुकोबांच्या जाण्यानंतर गरोदर जिजाईने पोरं बाळं घेऊन देहू गाव सोडले ते कायमचेच. कान्होबा सुद्धा देहू गाव सोडून कायमचे सासरवाडीत राहायला गेले. तुकोबांची मुलंही पंचवीस वर्षे देहू मध्ये फिरली नाहीत. याचाच अर्थ तुकोबांच्या जाण्याने या सर्वांची ताटातूट झाली होती. त्यांच्यावर प्रचंड आघात झाला होता. म्हणून आपण बीज साजरी करत असताना चुकूनही एकमेकांना शुभेच्छा देऊ नयेत. अशाप्रकारे त्यादिवशी तुकोबा कुडीसहित गुप्त झाले त्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदा होती. म्हणजेच त्या दिवशी धुलिवंदन होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला (बीज) तुकोबा आता परत येणार नाहीत असा निर्णय झाला म्हणून तेव्हापासून धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज साजरी केली जाते. (अर्थात ज्यांना तारीख तिथीच्या वादात अडकायचे नाही त्यांनी २ फेब्रुवारी रोजी तुकोबांची जयंती तर ९ मार्च रोजी त्यांचा स्मृतीदिन साजरा करावा.)

 

Reactions

Post a Comment

0 Comments