Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहर महिलाबचत गटांची रांगोळी स्पर्धेतून पर्यावरण जागृती

 सांगोला शहर महिलाबचत गटांची रांगोळी स्पर्धेतून पर्यावरण जागृती



 नगरपरिषदेच्या 'माझी वसुंधरा' अभियानातून घेतली प्रेरणा


सांगोला (कटूसत्य वृत्त):-   पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी  राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, आकाश,वायू,अग्नी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत  पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून शहरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, वृक्षारोपण करणे, वीज व पाण्याचे काटकसरीने बचत करणे याबाबतची जनजागृती तसेच सायकल व विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणेसाठी प्रोत्साहित करणे, सौर ऊर्जा बाबत जनजागृती करणे इत्यादी उपक्रम नगरपरिषदस्तरावर राबविण्यात येत आहेत. सांगोला नगरपरिषद करीत असलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीतून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत स्थापन झालेले बनकरवाडी व चांडोलेवाडी येथील बचतगटांनी रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम पार पाडला आहे.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत सांगोले नगरपरिषद हद्दीत 158 बचत गट कार्यरत असून या बचत गटांद्वारे  सांगोले शहरात विविध  उपक्रम  आयोजित करण्यात येत असतात.यातीलच बनकरवाडी व चांडोलेवाडी येथील बचतगटांनी सांगोले नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असणाऱ्या जनजागृतीतुन प्रेरणा घेत रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून  पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये यशस्वी, संत नामदेव, गार्गी, स्वराज्य, प्रतिक, जाई, राधाकृष्ण व मायाक्का या बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदविला. या रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी अतिशय छान असे निसर्ग संवर्धनाबाबत संदेश देणाऱ्या रांगोळी रेखाटल्या होत्या. यामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, स्वच्छता, आरोग्य इ. बाबत संदेश रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून दिले होते. 
       बनकरवाडी येथील घेण्यात आलेल्या पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धेमध्ये रंजना मधुकर बनसोडे यांनी प्रथम क्रमांक, सुवर्णा नंदकुमार बनसोडे यांनी द्वितीय क्रमांक व वैशाली शंकर पिसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर चांडोलेवाडी येथील घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये राणी दत्तात्रय चांडोले यांनी प्रथम क्रमांक, संध्याराणी बाळासाहेब चांडोले यांनी द्वितीय क्रमांक व स्नेहल राजपाल चांडोले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सदर स्पर्धेसाठी सांगोला नगरपरिषदेचे श्री योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी, बिराप्पा हाके, समुदाय संघटक व राहुल खडतरे,  क्षेत्र समन्वयक, माविम हे उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन माविच्या सहयोगिनी कोमल चांडोले यांनी केले.
“महिला बचत गटांनी  रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अश्या प्रकारचे उपक्रम हे माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषद करीत असलेल्या जनजागृती मोहीमेची पोहोच पावतीच आहे.”
- कैलास केंद्रे,मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद


Reactions

Post a Comment

0 Comments